। सुधागड-पाली । वार्ताहर ।
वाढत्या उन्हात पाण्यासाठी वन्यजीवांची भटकंती होत आहे. असेच पाण्याच्या शोधामध्ये सुधागड तालुक्यातील वाकणवाडी गावातील बस स्टॉप जवळील एका जुन्या पडक्या विहिरीमध्ये गुरुवारी (दि. 03) दोन रानडुकरांची पिल्ले पडली होती. ही विहीर खोल असून विहिरीचे पाणीदेखील आटले आहे. त्यामुळे या रानडुकराच्या पिलांना तेथून बाहेर पडणे अशक्य होते. पालीतील वन्यजीव रक्षक शंतनू लिमये यांना रविराज परदेशी यांनी विहिरीमध्ये रानडुकराची पिल्ले पडली असल्याची माहिती दिली. त्यानंतर वनविभाग, स्थानिक वन्यजीव रक्षक व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था यांनी रानडुकरांच्या पिल्लांना सुखरूप बाहेर काढले व नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.