अलिबाग जिल्हा कारागृहात खुलेआम गुटखा, सिगारेटसारखे तंबाखुजन्य पदार्थ
लाचखोर जेलरमुळे कारागृहातील गैरप्रकार चव्हाटयावर
। अलिबाग । भारत रांजणकर ।
कैद्याला आवश्यक सामान आणि सुविधा पुरविण्यासाठी लाच घेणार्या अलिबाग येथील जिल्हा कारागृहाची महिला जेलर सुवर्णा चोरगे हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्यानंतर कारागृहातील गैरप्रकार पुन्हा एकदा चव्हाटयावर आले आहेत. या प्रकारामुळे कायद्याने बंदी असलेल्या गुटखा, सिगारेट आदी तंबाखूजन्य पदार्थांना कायद्याने मनाई असतानाही पैसे घेऊन कैद्यांना खुलेआम पुरविले जात असल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे अलिबाग कारागृहाकडे राज्याचे लक्ष वेधले गेले आहे.
न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याला सामान देण्यासाठी चार हजारांची लाच मागणार्या अलिबाग कारागृहाच्या महिला जेलरला काल रंगेहाथ पकडले. प्रतिबंधक विभागाच्या या तडाख्याने भ्रष्ट अधिकार्याचे धाबे दणाणले आहे. मुळची रामराज येथील सासूरवाशीण असलेल्या जेलर सुवर्णा चोरगे हिच्यावरील कारवाईमुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात जोरदार चर्चा केली जात आहे.
या घटनेमुळे कारागृहात मोठया प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी नाईक हत्याप्रकरणात कोठडीत असलेल्या पत्रकार अर्णव गोस्वामी यांना मोबाईल पुरविल्याबाबत तत्कालिन कारागृह अधिक्षक अंबादास पाटील यांना कारागृह महानिरीक्षक यांनी निलंबित केले होते. त्यानंतर पाच महिन्याने ही घटना घडली आहे. मोठया प्रमाणावर कारागृहांमध्ये गैरप्रकार सुरु असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी गृहखात्याने पावले उचलण्याची गरज आहे.
जामिनावर मुक्तता
लाच स्विकारल्यानंतर एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावलेल्या लाचखोर जेलर सुवर्णा चोरगे हिला आज पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर केले असता. न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली
दोन महिन्यांत चार लाचखोर जाळयात
गेल्या दोन महिन्यात रायगड जिल्ह्यातील चार लाचखोर अधिकार्यांना जाळयात पकडण्याची कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधिक्षक सुषमा सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केल्याने भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांचे धाबे दणाणले आहे.