| नागोठणे | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गावर नागोठण्याजवळील पळस गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ गाडीच्या मागील बाजूस भरधाव वेगाने येणाऱ्या इनोव्हा गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात स्कॉर्पिओ चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर, इनोव्हा गाडीमधील चालकासह चार प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी (दि.8) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला.

यासंदर्भात नागोठणे पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी अकबर सैफुद्दीन सकवारे (32) रा. लोटे, ता. खेड, रत्नागिरी हा आपल्या ताब्यातील इनोव्हा गाडी वडखळ बाजूकडून नागोठणे बाजूकडे भरधाव वेगाने चालवीत घेऊन येत असताना मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणेजवळील पळस गावच्या हद्दीत सकवारे याचे आपल्या इनोव्हा गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, स्कॉर्पिओ गाडी व बाजूला उभा असलेला चालक याला धडक देत इनोव्हा गाडी रस्त्याच्या बाजूला खाली उतरली.
दरम्यान, चालक प्रेमजित काकडे (34) रा. बेलपाडा, खारघर-नवी मुंबई हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर इनोव्हा गाडीचा चालक अकबर सकवारे याच्यासह प्रवास करणारे हिना सकील शेख (23), फाईन शेख (11), मदिया सकवारे (23), हबीया मुल्ला (60) आदींना गंभीर स्वरूपच्या जखमा झाल्या होत्या. या अपघाताची माहिती मिळताच नागोठणे पोलिसांनी अपघातस्थळी जाऊन सर्व जखमींना नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर त्यांना तातडीने अधिक उपचारासाठी पनवेल येथे पाठविण्यात आले. या अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, सपोनि संदीप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नारायण चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत.