। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
पनवेल येथील शिरढोण येथे राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गतच्या पाणीपुरवठा योजनेत गैरव्यवहार झाल्याबाबत शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी आज सभागृहात प्रश्न उपस्थित केला.
राष्ट्रीय पेयजल अंतर्गत कामे चालू असताना मुंबई-गोवा महामार्ग गेला, त्यामुळे झालेली नुकसान भरपाई मिळाली का? तसेच एकाच कामाचा दोन योजनेतून लाभ घेऊन ते काम पूर्ण केल्याचा व घोटाळा झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे या संदर्भात चौकशी करावी, अशी मागणी आ. जयंत पाटील यांनी केली आहे. शिरढोण येथील पाईपलाईनचे काम जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर करण्यात आले होते. मात्र ठेकेदाराने पुन्हा दुसर्या योजनेतून हे काम पूर्ण केल्याचा संशय आहे. असे असल्यास सरकार त्यावर चौकशी करणार का?
यावर उत्तर देताना पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, शिरढोण गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी 2014 साली तांत्रिक मान्यता देण्यात आली होती. तसेच 2017 साली प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या मान्यतेनंतर ही योजना पुर्ण करण्यासाठी ठेकेदार मे.पी.सी. जाधव यांना 18 महिन्याची मुदत देण्यात आली होती. मे.पी.सी. जाधव यांनी त्यानूसार काम सुरु केले. त्यानंतर कोरोनाचे संकट आले. परिणामी, मजुर कमी असल्यामुळे काम थांबले. कालांतराने ठेकेदाराचा मृत्यू झाला. त्यानंतर जलजीवन मिशन योजना सुरु कार्यन्वित झाली. त्यावेळी जेवढे काम मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या माध्यमातून झाले तेवढ्याच कामाचे 88 लाखांचे बिल ठेकेदाराला देण्यात आले. तसेच ही योजना जलजीवन मिशन अंतर्गत करुन कामाला मंजूरी देण्यात आली. सध्या विलास मांडे या ठेकेदाराला हे काम देण्यात आले असून पुढील वर्षापर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.