। नागपूर । वृत्तसंस्था ।
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले आहेत. याआधी महिन्याभरापूर्वी त्यांच्या नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात सकाळी धमकीचे तीन फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आज त्यांच्या संपर्क कार्यालयात पुन्हा दोनदा असे फोन कॉल्स आलेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी दोनवेळा गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या समोरील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे फोन आलेले आहेत. धक्कादायक म्हणजे पुन्हा एकदा जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा या गुन्हेगाराच्या नावाने धमकीचे फोन आले आहेत. या फोननंतर गडकरी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी याची माहिती नागपूर पोलिसांना दिली आहे. यापार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही या विषयाला दुजोरा दिला आहे.
जरी कॉल करणाऱ्या व्यक्तीने तो जयेश कांथा उर्फ जयेश पुजारी बोलत असल्याचा दावा केला असला तरी धमकी देणारी व्यक्ती कोण आणि त्याने कुठून कॉल केले हे अजून स्पष्ट झालेले नाही.