आयएनएस ब्रह्मपुत्राला लागली आग; खलाशी बेपत्ता

| मुंबई | प्रतिनिधी |

अरबी समुद्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई बंदरातील ‘आयएनएस ब्रह्मपुत्रा’ या नौदलाच्या युद्ध नौकेला आग लागल्याची घटना घडली आहे. या अपघातानंतर एक खलाशी बेपत्ता आहे. मुंबईतील नौदल तळावर 21 जुलैच्या संध्याकाळी आयएनएस ब्रह्मपुत्रेची दुरुस्ती सुरू असताना ही घटना घडली आहे. जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आज सकाळपर्यंत आग आटोक्यात आणली. मात्र, आगीमुळे जहाज समुद्राच्या पाण्यात एका बाजूला झुकले. या घटनेबाबत नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना ही माहिती दिली आहे. सर्व प्रयत्न करूनही जहाज सरळ करता आले नाही, असे नौदलाने म्हटले आहे. जहाज त्याच्या बर्थजवळ म्हणजेच नांगराजवळ अधिकाधिक झुकत आहे. सध्या ते एका बाजूला विसावलं आहे. एक कनिष्ठ खलाशी वगळता जहाजातील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. बेपत्ता खलाशीचा शोध सुरू आहे. भारतीय नौदलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

आयएनएस ब्रह्मपुत्रा स्वदेशी क्षेपणास्त्र युद्धनौका
आयएनएस ब्रह्मपुत्रा ही भारतात बांधलेली पहिली क्षेपणास्त्र युद्धनौका आहे. ब्रह्मपुत्रा जहाजावर 40 अधिकारी आणि 330 खलाशी तैनात असतात. या जहाजाचे वजन अंदाजे 5,300 टन असल्याचे सांगितले जाते. लांबी 125 मीटर आणि रुंदी 14.4 मीटर आहे. ही युद्धनौका मध्यम श्रेणीच्या आणि विमानविरोधी तोफांनी सुसज्ज आहे. यात जमिनीवरून जमिनीवर आणि जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि टॉर्पेडो लाँचर्सही आहेत.
Exit mobile version