जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार; किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीला यश
। देवगड । प्रतिनिधी ।
भारतीय नौदलाची ‘आयएनएस गुलदार’ ही निवृत्त युद्धनौका अखेर तालुक्यातील विजयदुर्ग बंदर परिसरात आणण्यात आली आहे. ही युद्धनौका मराठा आरमाराचे मुख्य ठिकाण असलेल्या किल्ले विजयदुर्गच्या परिसरात उभी राहिल्यास असंख्य पर्यटकांची पाऊले इकडे वळतील आणि स्थानिकांना यातून रोजगार मिळू शकेल, अशी किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीची मागणी होती.
अलीकडील काही वर्षांत किल्ले विजयदुर्गला मोठ्या प्रमाणात पर्यटक भेटी देतात. किल्ले अष्टशताब्दी महोत्सवानंतर हे ठिकाण पर्यटनाच्या नकाशावर येण्यास मदत झाली. त्यानंतर या भागात पर्यटकांची संख्या वाढली. याच पार्श्वभूमीवर विजयदुर्गला येणार्या पर्यटकांसाठी भारतीय नौदलाची आयएनएस गुलदार ही निवृत्त युद्धनौका विजयदुर्ग खाडीत आणल्यास त्याचा मोठा लाभ होऊ शकेल, याकडे किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीने लक्ष वेधले होते. पालकमंत्री नीतेश राणे यांनाही निवेदन दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून काबीज केलेला आणि पुढे सरखेल कान्होजी आंग्रेंसह तुळाजी आंग्रेंपर्यंत तब्बल सुमारे 105 वर्षे मराठ्यांच्या अधिसत्तेत असलेला किल्ले विजयदुर्ग आणि त्याचे आरमारी साम्राज्य इतिहासाच्या पानांवर अधोरेखित असल्याचे दाखले देत विजयदुर्गला ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याचे संदर्भ देण्यात आले होते.
किल्ले विजयदुर्ग अष्टशताब्दी वर्ष महोत्सवानंतर राज्याच्या विविध भागांतील पर्यटकांची पावले विजयदुर्गच्या दिशेने पडू लागली. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी येण्यास काहीशी मदत झाली. किल्ले विजयदुर्गला भेटी देणार्या पर्यटकांना अधिकाधिक आनंद देण्याच्या हेतूने नौदलाची आयएनएस गुलदार ही युद्धनौका किल्ले विजयदुर्गच्या सभोवती उभी राहिल्यास असंख्य पर्यटकांची पाऊले इकडे वळतील आणि रोजगारही प्राप्त होईल.