| पोलादपूर | वार्ताहर |
ओंबळीमार्गे खेडला जाणाऱ्या खासगी लक्झरी बसची दुचाकीला धडक बसून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. सदरचा अपघात रविवारी (दि.16) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला. दोन्ही तरूणांना जखमी अवस्थेत पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये हलविण्यात आले. तेथे दोघांना मृत घोषित करण्यात आले. मृतांची नांवे राहुल श्रीरंग साळुंखे (27) व सिध्देश गणेश सकपाळ (23) अशी असल्याची माहिती पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामधून प्राप्त झाली.
रात्री ओंबळी येथे उशिरापर्यंत शिमग्याचे कार्यक्रम सुरू होते. पहाटे मंदिरामध्ये प्रकाशव्यवस्था सुरूच राहिल्याने हे दोघे राहूल आणि सिध्देश सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ओंबळी गावातून मंदिराच्या लाईट बंद करण्यासाठी दुचाकीवरून जात होते. तीव्र वळणावर त्यांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या सुजाता या खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसची ठोकर बसली. या घटनेनंतर ओंबळी गांवातील शिमगोत्सव तातडीने रद्द करण्यात आला असून सर्वत्र शोकाकूल वातावरण पसरले आहे. पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेद करण्यात आले. त्यानंतर मृतांच्या नातवाईकांच्या ताब्यात तरूणांचे मृतदेह देण्यात आले. त्यानंतर ओंबळी गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची नोंद पोलीसात झाली आहे. दरम्यान, पोलादपूर ते खेड दरम्यान कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्ग सुरू झाले असतानादेखील ओंबळीमार्गे खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल कंपनीच्या बसने या अरूंद रस्त्यावरून खेडकडे जाण्याचा मार्ग का निवडला याची माहिती पोलीस घेत आहेत.