नितीन देसाईंच्या आत्महत्येची इनसाईड स्टोरी

मृत्यूचा देखावा एक महिन्यापूर्वीच
| रायगड | अविष्कार देसाई |
एन.डी. स्टुडीओतील रंगमंचावर प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा गळफास घेऊन लटकलेला मृत देह पोलिसांना 2 ऑगस्ट 2023 रोजी आढळून आला होता. येथील रंगमंचावर आत्महत्तेसाठी लटकवलेली दोरी, त्याच्या शेजारी उभी केलेली शिडी आणि खाली धनुष्यबाणाची प्रतिकृती असा देखावा नितीन देसाई यांनी किमान महिनाभरापूर्वीच निर्माण केल्याचे समोर आले आहे. असे म्हटले जाते की सच्चा कलाकार हा शेवटच्या श्वासापर्यंत कलेसाठी जगतो. नितीन देसाई यांनी देखील शेवटच्या श्वासापर्यंत कलेची पुजा केली.

नितीन देसाई हे सुमारे 250 कोटी रुपयांच्या कर्जाच्या बोजा खाली दबले होते. याबाबतच्या तब्बल 11 व्हाईस क्लिप पोलिसांनी घटनास्थळावरुन ताब्यात घेतल्या आहेत. त्यामध्ये धक्कादायक खुलासे पुढे आले आहेत.देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी ते दिल्लीला गेले होते. रात्री 12 वाजता विमानतळावरुन ते आपल्या एनडी स्टुडीओमध्ये रात्री दोन वाजता पोचले. मंदिरात देवाचे दर्शन घेतले. त्यांचा मदतनीस योगेश ठाकूर याला रंगमंचाचा दरवाजा उघडण्यास सांगितले. रंगमंचावरील आपण उभारलेला आपल्याच मृत्यूचा देखावा व्यवस्थित आहे का याची पाहणी त्यांनी केली.त्यानंतर त्यांनी रंगमंचाला टाळे लावले आणि चावी देसाई यांनी आपल्याकडे ठेवली. त्यानंतर रात्री देसाई हे सलमान व्हिला या बंगल्यातून पुन्हा रंगमंचाकडे गेल्याचे सीसीटिव्हीमध्ये दिसत आहे.

दरम्यान, देसाई यांनी काही व्हॉईस क्लिप तयार केल्या होत्या त्या सकाळी संबंधीतांना पाठव असे योगेश याला सांगितले होते. त्यानंतर योगेश सकाळी आल्यावर देसाई यांच्या बंगल्यात गेला मात्र ते तेथे दिसले नाहीत. नंतर त्याने व्हॉईस क्लिप पाठवताना त्यातील एक क्लिप ऐकली. त्याला काही संशय आला आणि तो थेट रंगमंचाकडे गेला. तेथे त्याला देसाई यांचा मृतदेह दोरीला लटकलेला दिसला.

पाऊले चालती पंढरीची वाट…. देसाई यांच्या अन्य क्लिपमध्ये शेवटचे वाक्य हे असल्याचेही समोर आले आहे. यातून त्यांचा प्रवास शेवटाकडे सुरु झाल्याचे त्यांनी या व्हॉईस क्लिपमधून दाखवून दिले आहे.

रंगमंचावरील धनुष्यबाणाचा अर्थ काय
नितीन देसाई यांनी रंगमंचावर आत्महत्या केली. तेथे खाली धनुष्यबाण दोरीच्या सहायाने तयार केला होता. देसाई हे अतिशय सर्वसामान्य कुटूंबातून आलेले होते. शुन्यातून त्यांनी विश्व निर्माण केले होते. एन डी स्टुडिओ उभारताना हे शिवधनुष्य पेलले होते. आता परिस्थिती बदललेली असल्याने कदाचीत हेच शिवधनुष्य आता उचलणे शक्य नाही, असा संदेश तर त्यांना या धनुष्यबाणाच्या प्रतिकृतीतून द्यायचा नव्हता ना असा कयास लावला जात आहे.

लालबागच्या राजाला माझा शेवटचा नमस्कार
पोलिसांनी घटनास्थलावरुन काही इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस जप्त केले आहेत. त्यातील एका व्हॉईल क्लिपमध्ये देसाई सुरुवातीला म्हणतात. लालबागच्या राजाला माझा शेवटचा नमस्कार…. देसाई हे लालबागच्या राजासाठी देखावा उभारत होते. त्यांची त्याच्यावर भक्ती देखील होती. परंतू देसाई यांचा लालबागच्या राजाला तो शेवटचा नमस्कार ठरला.

Exit mobile version