। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यात खरीप हंगामातील भाताच्या पिकावर खोडकिडा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकर्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कृषी अधिकारी आणि कृषी शास्त्रज्ञ यांनी तालुक्याच्या विविध भागात भेटी देऊन भाताच्या पिकाची पाहणी केली. कृषी विभागाने खोडकिडा ग्रस्त भागातील शेतीच्या पिकांची पाहणी करून शेतकर्यांना योग्य सल्ले दिले असून चांगल्या भाताच्या पिकासाठी शेतकर्त्यांनी कोणती खबरदारी घ्यावी, यासाठी फवारणी करण्याचे आवाहन केले आहे.
कर्जत तालुक्यात 9500 हेक्टर जमिनीवर भाताची शेती करण्यात येते. यावर्षी श्रावण महिन्यात पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. यामुळे भाताच्या शेतीवर खोडकिडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. आपल्या पिकावर पडलेल्या रोगापासून शेती कशी वाचवावी यासाठी शेतकर्यांनी कर्जत कृषी विभागाशी संपर्क साधला होता. यांनतर कृषी विभागाने तात्काळ हालचाली करीत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्जत भात संशोधन केंद्राचे संशोधक शास्त्रज्ञ डॉ. वैशाली सावंत यांना शेतीची पाहणी करण्यास विनंती केली. यानंतर 16 आणि 17 ऑगस्ट रोजी कर्जत तालुक्यातील भाताच्या शेतीची पाहणी कृषी विभागाने केली.
यावेळी कृषी अधिकारी अशोक गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळी, मंगेश गलांडे यांच्यासह कृषी पर्यवेक्षक पंकज सोनकांबळे, कृषी सहाय्यक कोषाणे, संदिप लाळगे, कृषी सहाय्यक अनिल रुपनवर, रुपाली सोनोने, वैजनाथ, कृषी पर्यवेक्षक शशिकांत गोसावी, दत्तु देवकाते, खांडपे, श्रद्धा देवकर, राजश्री तायडे, सारिका काळे, कडाव, स्मिता गावंडे हे सोबत होते.