। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यातील वावे येथे बिबट्याच्या हल्ल्यात बैल मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील वावे गावाच्या वेशीवर असलेल्या जंगलात देवजी पारावे यांनी आपला बैल सकाळी चरण्यासाठी सोडला होता. सायंकाळी बैल परत आला नाही म्हणून बैलाला आणण्यासाठी जंगलात गेले असता त्यांना बैल जखमी अवस्थेत दिसून आला. बिबट्याने बैलाच्या मानेवर नखे मारून बैलाच्या पाठच्या बाजूचा पुर्णतः फडशा पाडला होता. यांसह देवजी पारावे यांना त्याच ठिकाणी बकरीला देखील फाडून ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यांनी कसे बसे बैलाला जखमी अवस्थेतच गावापर्यंत आणले. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर जखमी झाल्याने काही काळाने बैलाने आपला प्राण सोडला. देवजी पारावे यांनी ताबडतोब या घटनेची माहिती वनविभाग अधिकार्यांना दिली आहे.