कर्जतमधील विकासकामांची मुख्याधिकर्‍यांकडून पहाणी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी पालिका हद्दीतील विकासकामांची अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी अनेक कामांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या तात्काळ दर्जा सुधारण्याचे आदेश ठेकेदारांना दिले आहेत. दरम्यान, पुढील भेटीच्या वेळी कामांचा दर्जा आढळून आला नाही तर कारवाई केली जाईल अशा सूचना गारवे यांच्याकडून करण्यात आल्या आहेत.

नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात नवी दिल्लीत सत्कार झाल्यानंतर कर्जत या की वर्ग नगरपरिषदमधील कारभाराकडे देशाचे लक्ष असणार आहे. त्यामुळे शहरात होणारी कामे आणि सध्या सुरु असलेली विकासकामे यांचा दर्जा उच्चपातळीचा असावा असा प्रयत्न पालिका प्रशासनाचा आहे. त्यामुळे शहरात सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी शहरातील विविध भागात फिरून केली.

त्यावेळी शहरातील काही रस्त्यांची नव्याने सुरु असलेल्या बांधकामांची पाहणी केली असता त्या रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या सरप्राईज व्हीजिटमध्ये ठेकेदार प्रत्यक्ष कामावर हजर नसल्याचे आढळून आले, त्यामुळे त्या त्या ठेकेदाराना बोलावून घेत दर्जा कायम राखण्याच्या सूचना देतानाच पुन्हा आल्यावर दर्जाबाबत संभ्रम असल्यास ठेकेदारावर कारवाई करावी, असे आदेश नगरभियंता मनिष गायकवाड आणि स्वच्छता निरीक्षक सुदाम म्हसे यांना दिले आहेत.

दरम्यान, पालिका मुख्याधिकारी यांच्या या भेटीमुळे कर्जत नगरपरिषदमधील विकासकामे दर्जा राखून होतील असा विश्‍वास नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्याचवेळी अशाच भेटी मुख्याधिकारी यांनी शहरातील वेगवेगळ्या भागात आठवड्यातून किमान एकदा तरी द्यायला हव्यात अशी सूचना देखील नागरिक करीत आहेत.

Exit mobile version