सिडको शिष्टमंडळाचा पाहणी दौरा

नागरिकांच्या आशा पल्लवीत

| पनवेल | वार्ताहर |

भीमशक्ती संघटना आणि रिपब्लिकन सेना यांच्या माध्यमातून सिडकोचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याचे आंदोलन येत्या दहा तारखेला आयोजित केले होते. या आंदोलनाला आपला संपूर्ण पाठिंबा जाहीर करत शेतकरी कामगार पक्षाच्या वाहतूक सेलचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रभुदास भोईर यांनी  राज्य माथाडी कामगार संघटनांची पूर्ण ताकद देखील या आंदोलनात घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा केली होती. प्रभुदास भोईर यांच्या आंदोलनाच्या खणखणीत इशार्‍यानंतर सिडको प्रशासन वठणीवर आले. सिडको प्रशासनाने तातडीने बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये ठरल्यानुसार सिडकोच्या शिष्टमंडळाने खिडुकपाडा येथील भेडसावणार्‍या समस्या तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन या ठिकाणची पाहणी केली.

खिडुकपाडा हे सिडको प्रकल्पग्रस्तांच्या 95 गावांपैकी असे गाव आहे ज्याच्या सीमा सिडकोने अधोरेखित केलेल्या आहेत. ग्रामस्थांवर सीमा निर्मितीचे निर्बंध लादणार्‍या सिडकाने या ठिकाणी  नागरी सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. येथील ग्रामस्थ अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढत असल्याचे प्रभुदास भोईर यांनी सांगितले. त्यांनी केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये विसर्जन तलाव स्वच्छता आणि विसर्जन घाटाची निर्मिती, जे ब्लॉक रस्त्याचे काँक्रिटीकरण, मुलांना खेळण्यासाठी मैदान, ग्रामस्थांच्या सार्वजनिक कार्यक्रमांकरिता समाज मंदिराची निर्मिती यांचा समावेश होता. या सार्‍या ठिकाणांची सिडकोच्या शिष्टमंडळाने पाहणी केलेली असून सकारात्मक अहवाल देणार असल्याचे प्रथमदर्शनी सांगितले. सिडको शिष्टमंडळाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल येथील ग्रामस्थांच्या सुविधा मिळण्याच्या आशा पल्लवीत झालेले आहेत.

सिडकोच्या वतीने दीपक हरताळकर, विलास बनकर, शारदा फडतरे, प्रशांत बनकर, श्रीमती अपूर्वा यांनी पाहाणी केली. तर सिडको अधिकार्‍यांच्या पहाणी दौर्‍याच्या वेळेस रामदास शेवाळे, सुदाम पाटील, प्रभुदास भोईर, सुभाष गायकवाड, जिवन गायकवाड, सुरेश भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version