| दिघी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहरातून दिवेआगरकडे जाताना पोहमिल नाका या चौकात तीन बाजूंनी ये-जा होणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठी आहे. त्यामुळे श्रीवर्धनहून बोर्लीकडे येणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी येथील रहिवासी करत आहेत. बोर्लीपंचतन येथून श्रीवर्धन शहराकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यातील सरळमार्गे जाणारा रस्ता सध्या सुसाट बनला आहे. याच मार्गावर दत्तमंदिरापासून मोठी वस्ती आहे. मात्र, बांधकाम विभागाने रहदारी ठिकाणी गतिरोधक न बसवता पादचाऱ्यांचा जीव धोक्यात घातला आहे.
या चौकातून मुंबई, पुणे येथून दिवेआगर पर्यटनाकडे वळणाऱ्या तसेच दिवेआगरला भेट देऊन पुढे हरिहरेश्वर तीर्थक्षेत्राला जाणाऱ्या वाहनांच्या नेहमीच रांगा दिसून येतात. त्यामुळे रस्ता ओलांडायचा म्हटलं की, अंगावर अक्षरशः काठा उभा राहतो. तीनही बाजूने वाहनांची वर्दळ सुरू असल्याने दहा ते पंधरा मिनिटे ताटकळत उभे राहिल्यानंतर जीवघेणी कसरत करीत रस्ता ओलांडावा लागतो. यामध्ये अचानक वेगात येणाऱ्या वाहनांच्या कित्येक पादचाऱ्यांना धडक बसल्या आहेत.
या रस्त्याच्या दुतर्फा किराणा दुकाने, बँक, हॉटेल तसेच अनेक आवश्यक वस्तूंची मोठी दुकाने आहेत. याशिवाय या चौकातून गावातील वस्तीत जाण्यासाठी दोन अंतर्गत रस्ते जोडले गेले आहेत. त्यामुळे येथे नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे या रस्त्याला गतिरोधक बसवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे.