| उरण | प्रतिनिधी |
अश्विन शुद्ध प्रतिपदेला भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात या पवित्र सणाचे जंगी स्वागत केले जाते. हा सण केवळ धार्मिक विधी नसून, तो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे आणि आदिशक्तीच्या भक्तीचे एक अनोखे प्रतीक आहे. अशा नवरात्रोत्सवाचे उरण तालुक्यात जंगी स्वागत करण्यात आले असून, ठिकठिकाणी दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना विधी पूर्वक पूजा अर्चा करून करण्यात आली आहे.
नवरात्रोत्सव हा तरुणाई बरोबर आबालवृद्धांना एक प्रकारे पर्वणी असते. अशा शारदीय नवरात्र उत्सवात पहिल्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये घटस्थापना (कलश स्थापना) केली जाते. तांब्याच्या किंवा मातीच्या कलशात पाणी भरून, त्यावर विड्याची किंवा आंब्याची पाने आणि नारळ ठेवून देवीचे आवाहन केले जाते. कलशाखालील मातीत नऊ प्रकारची धान्ये (नवधान्य) पेरावी लागतात. नऊ दिवस अखंड जळणारा नंदादीप देवीच्या निरंतर उपस्थितीची साक्ष देतो. नवरात्रोत्सवाचे खरे रंग संध्याकाळनंतर पाहायला मिळतात. गुजरातची परंपरा असलेला गरबा आणि दांडिया रास आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि जगभरात मोठ्या उत्साहाने खेळला जातो. रंगीबेरंगी पारंपारिक पोषाख परिधान करून, ढोल आणि संगीताच्या तालावर रात्रभर चालणारा हा नृत्योत्सव म्हणजे तरुणाईसाठी आनंदाची पर्वणीच असते. महाराष्ट्रात नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे परिधान करण्याची आधुनिक परंपराही महिला वर्गात अत्यंत लोकप्रिय आहे.
त्यामुळे हा उत्सव समाजाला एकत्र आणण्याचे काम करतो. तसेच, यादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भजने, कीर्तने आणि रास गरबा यांचे आयोजन केले जाते. अष्टमीला महालक्ष्मी पूजन आणि नवमीला होणारे होम-हवन उत्सवाची भव्यता अधिक वाढवतात. नवरात्रीचा हा जंगी सोहळा शेवटी विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर संपन्न होतो, जिथे आपण सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याची पाने वाटून आनंद साजरा करतो.अशा नवरात्रोत्सवाचे उरण तालुक्यात जंगी स्वागत करण्यात आले असून, ठिकठिकाणी दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना विधी पूर्वक पूजा अर्चा करून करण्यात आली आहे. तसेच, तालुक्यातील अनेक दुर्गामातेच्या मंदिरात ही नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून अनेक भक्तांनी आप आपल्या कुटुंबासह देवीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.







