कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील प्रकाराने संताप
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक अडकमोल यांच्याकडून रुग्णांना असभ्य वागणुक दिली जात असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईक यांनी केला आहे. कर्जत उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सेवा यांचा दर्जा आणि तेथील सुविधा याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कर्जतजवळील वंजारवाडी येथील रहिवाशी प्रभाकर गंगावणे यांचे काका त्यांच्या गरोदर मुलीला डिलिव्हरीसाठी रात्री साडेअकरा ते बारा वाजेच्या दरम्यान कर्जत उपजिल्हा रुग्णालयात घेऊन आले. त्यावेळी डिलिव्हरी करणारे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित नव्हते. ड्युटीवरील परिचारिकेने गरोदर महिलेची तपासणी केली, त्यावेळी तेथे उपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक अडकमोल यांनी त्या गरोदर महिलेला अन्य रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. रुग्णांचे नातेवाईक यांनी उपजिल्हा रुग्णालयात सर्व सोयीसुविधा उपलब्ध असताना आणि रात्रीच्या वेळी रुग्णाला बाहेर नेण्याचा सल्ला का दिला जात आहे? त्यावेळी डॉ. अडकमोल यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय मस्कर यांना फोन करून तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावण्याची विनंती केली. डॉ. म्हसकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तज्ज्ञ डॉक्टर पाठवून देण्याचे आश्वासन दिले.
वैद्यकीय अधिक्षक डॉ. म्हसकर यांनी तत्परता दाखवली पण काही वेळात डॉ. म्हसकर यांनी पुन्हा फोन करून सांगितले की, तज्ज्ञ डॉक्टर ठाणे येथे गेले आहेत. त्यामुळे उल्हासनगर किंवा एमजीएम रुग्णालयात डिलिव्हरीसाठी योग्य ती व्यवस्था केली जाईल. त्या डिलिव्हरीसाठी आलेल्या गरोदर महिलेला पुढील उपचारासाठी पुढील रुग्णालयात हलविण्यात आले. या सर्व प्रक्रियेदरम्यान, डॉ. दीपक अडकमोल यांनी रुग्णासोबत आलेल्या नातेवाईकांशी उद्धट आणि अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळे प्रभाकर गंगावणे यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. म्हसकर यांच्याकडे तक्रार करत, “डॉक्टरांनी माणुसकी जपत संवाद साधावा, रुग्ण आणि नातेवाईकांशी नम्रता बाळगावी’’ अशी स्पष्ट मागणी केली. या प्रकारामुळे उपस्थित असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, डॉ. अडकमोल यांना शिस्त आणि माणुसकी याचे धडे देण्याची गरज आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.