अॅड. गौतम पाटील यांचे हस्ते धनादेशाचे वितरण
| अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जे.एस.एम. कॉलेजमधील एम.ए. भाग-2 मध्ये शिकणार्या विधान नामदेव दिवकर या विद्यार्थ्याचे दि. 01 नोव्हेंबर 2019 रोजी अपघातात निधन झाले होते. दिवा-कोकबन येथे राहणारा हा विद्यार्थी आपल्या गावाकडे जात असताना रस्त्यात उभा असताना हा अपघात झाला होता. त्यावेळी जखमी झालेल्या विधान यांचे नंतर इस्पितळात उपचार घेताना निधन झाले.
महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे राबविल्या जाणार्या विद्यार्थी सामूहिक विद्यार्थी विमा योजने अंतर्गत न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमार्फत जिवन विमा काढला जातो. 35 रू. ते 40 रू प्रतिवर्षी एवढ्या कमी हप्त्यात विद्यार्थ्याचा एक लाख ते दोन लाख रूपयाचा विमा काढला जातो. कंपनीने अपघाताची शहनिशा करून कॉलेजच्या सहकार्याने दोन लाख रुपयांचा विमा मंजूर केला. सदर रक्कमेचा धनादेश विधानचे वडिल नामदेव दिवकर यांचेकडे जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांचे हस्ते सुपूर्द करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, मिलिंद पाटील, प्रबंधक श्री गबाजी गिते, सिमंतीनी ठाकूर, विधान दिवकर यांचे नातेवाईक उपस्थित होते. विम्याचा लाभ विद्यार्थ्याला मंजूर केल्याबद्दल कंपनीचे अधिकारी कृष्णा नायर यांना धन्यवाद दिले.