| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या लाखो गोविंदांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या काही वर्षांपासून दहीहंडीच्या सरावादरम्यान आणि प्रत्यक्ष उत्सवा दरम्यान होणाऱ्या अपघातांमुळे अनेक गोविंदांना दुखापतींचा सामना करावा लागतो. यावर तोडगा काढण्यासाठी आता राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यावर्षी, सुमारे 1.50 लाख गोविंदांना विमा सरंक्षण देण्यात येणार आहे. राज्य सरकार गोविंदा समन्वय समिती (महा.) च्या माध्यमातून तब्बल 1.50 लाख गोविंदांना ‘ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी’द्वारे विमा संरक्षण देणार आहे. या योजनेसाठी 1 कोटी 12 लाख 50 हजार रुपये इतक्या रकमेचा विमा प्रस्ताव अंतिम करण्यात आला आहे.
दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या या विमा योजनेत अपघातानुसार वेगवेगळ्या प्रकारची भरपाई दिली जाणार आहे.त्यानुसार दुर्दैवाने एखाद्या गोविंदाचा दहीहंडीच्या वेळी मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची भरपाई मिळेल. दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात-पाय गमावल्यासदेखील 10 लाख रुपयांची भरपाई दिली जाईल. अपंगत्व: एक डोळा, एक हात किंवा एक पाय गमावल्यास 5 लाख रुपयांची भरपाई मिळेल. याव्यतिरिक्त, मानवी मनोरे रचताना झालेल्या दुखापतींवर उपचारासाठी 1 लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय खर्चही या विमा योजनेत समाविष्ट आहे.






