बौद्धिक ‘अक्षम’ मुले बनणार ‘सक्षम’ रायगड जिल्हा परिषदेचा पुढाकार

बुध्यांक वाढीसाठी दिले अभ्यासाचे साहित्य

। रायगड । प्रतिनिधी ।

बुध्यांक 70 ते 90 मध्ये असल्याने समाजातील वावर या मुलांना बौद्धिक अक्षम म्हणून संबोधतो. अशा बौद्धिक अक्षम असणार्‍या रायगड जिल्ह्यातील मुलांना त्यांचा बुध्यांक वाढवून सक्षम बनविण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील बौद्धिक अक्षम असणार्‍या सुमारे दीड हजार मुलांना बुध्यांक वाढविण्यास मदत करण्यात येणार आहे. रायगड जिल्हा परिषदेने पहिल्या टप्प्यात 418 बौद्धिक अक्षम मुलांना बुध्यांक वाढविणारे शैक्षणिक आणि मनोरंजनातून शिक्षणाचे साहित्य वाटप केले आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, वरिष्ठ अधिकारी सागर तुपे, कर्जत तालुका गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड, जिल्हा समन्वयक प्रकाश जोगळेकर, साधन व्यक्ती रवींद्र विशे, महादेव माने, सुरेश बेडके, करुणा मस्के आदी अधिकारी, कर्मचारी आणि बौद्धिक अक्षम पालक उपस्थित होते.

रायगड जिल्हा परिषद आणि राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांग जन संसक्तीकरण संस्थान, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल येथे कित्त्ये सादरीकरण आणि शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. पनवेल, उरण, पेण, कर्जत व खालापूर या तालुक्यातील बौद्धिक अक्षम (गतिमंद) असणार्‍या 152 मुली व 266 बौद्धिक अक्षम मुलांना शैक्षणिक साहित्याचे कित्त्ये वितरण करण्यात आले. देण्यात आलेल्या साहित्याचा वापर करण्याबाबतचे मार्गदर्शन बौद्धिक अक्षम मुलांच्या पालकांना करण्यात आले. राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांग जन संसक्तीकरण संस्थान, नवी मुंबई यांच्यामार्फत बनविण्यात आलेले हे साहित्य बौद्धिक अक्षम मुलांसाठी त्यांच्या क्षमता आणि गरज लक्षात घेऊन बनविण्यात आले आहे. दिलेल्या साहित्यामध्ये मुलांसाठी विविध प्रकारचे फ्लॅश कार्ड, कोड्यांची पुस्तके, बौद्धिक खेळ, गणकयंत्र, डिजिटल घड्याळ, मोबाईल वजन काटा, लीटर, मीटर, ग्रामची मापे असे विविध प्रकारचे साहित्य बौद्धिक अक्षम मुलांना दिलेल्या पिशवीमध्ये आहे.

जिल्ह्यातील 418 मुलांना बुध्यांक वाढविणारे साहित्य देण्यात आले आहे. बौद्धिक अक्षम मुलांच्या पालकांनी दिलेल्या साहित्याचा चांगला वापर केल्यास ही मुले सक्षम बनतील. ही मुले स्वावलंबी, स्वयंपूर्ण बनून कुटुंबांचा उत्पादनशील घटक म्हणून समाजात स्थान निर्माण करतील.

पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी प्राथमिक,
रायगड जिल्हा परिषद
Exit mobile version