महार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांमध्ये तीव्र संताप

। सुतारवाडी । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे हे जणू असंख्य प्रवाशांच्या जीवाशी खेळण्यासाठीच आहेत की काय, असा ज्वलंत प्रश्‍न या मार्गावरून जाणार्‍या-येणार्‍या प्रवाशांना, तसेच वाहन चालकांना अनेक दिवसांपासून पडलेला आहे. परंतु, याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. कोलाड, खांब, पुई या महामार्गावरील जीवघेणे खड्डे प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत. येथून मार्ग काढताना समोरून येणार्‍या वाहनांना धडक बसण्याची दाट शक्यता आहे.
महामार्ग क्र. 17 वरील खांब गावच्या बायपास रस्त्याच्या स्थळी ढाबा व पेट्रोल पंप आहे. येथील रस्त्यावर कोलाडपर्यंत प्रवाशांना खड्डेमय प्रवासाला विळखा घालून जावे लागत असल्यामुळे प्रवाशांना संताप व्यक्त करावा लागत आहे. एकतर गेल्या बारा वर्षांपासून पनवेल ते इंदापूर महामार्गावरील रस्ता रुंदीकरण पूर्ण होईना, उलट गंभीर समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.
काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्याच्या कामांसाठी वाढीव रक्कम मंजूर केली होती. परंतु, अद्याप मुहूर्त सापडलेला दिसत नाही. येथील महीसदरा पुलावर दुचाकीचे अपघात यापूर्वी झालेले आहेत.
या मार्गावरील अपघातात अनेक निष्पापांना जीव गमावलेला आहे. तसेच पुगावजवळ असणार्‍या खड्ड्यांमुळे गेल्या आठवड्यात एक महिला जखमी झाली होती. सार्वजनिक बांधकाम खात्याने प्रवाशांच्या जीवाशी न खेळता जीवघेण्या खड्ड्यांची दखल घेणे आवश्यक आहे.

Exit mobile version