‘जे.एस.एम.’मध्ये आंतरमहाविद्यालयीन बुद्धीबळ स्पर्धा

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे यशस्वी आयोजन केल्यानंतर आता मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन बुद्धीबळ स्पर्धांच्या आयोजनाची तयारी अलिबाग येथील जे.एस.एम. कॉलेजमध्ये होत आहे.

दि.7 व 8 सप्टेंबर रोजी होणार्‍या या स्पर्धेत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 21 मुलांचे संघ व 13 मुलींचे संघ मिळून एकूण 225 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. 7 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता बुद्धीबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीस सुरुवात होणार आहे, अशी माहिती कॉलेजचे क्रीडा व जिमखाना प्रमुख प्रा. रवींद्र चिखले यांनी दिली.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी स्पर्धेची तयारी करीत आहेत. प्रा. हाके, प्रा. जयश्री पाटील, प्रा. सिमंतीनी ठाकूर, प्रा. आय.पी. कोकणे, आर.बी.गुरव, प्रा. एस.आर. ठोकळे, प्रा. सुनील आनंद आदी प्राध्यापक परिश्रम घेत आहेत. रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विलास म्हात्रे हे स्पर्धेचे मुख्य निरीक्षक म्हणून काम पहाणार आहेत. मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक, प्रा. मोहन अमृले हे उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version