| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभाग क्रमांक 4 मधील कुस्तीच्या स्पर्धा के.एम.सी कॉलेज खोपोली येथे पार पडल्या. यामधे जे.एस.एम महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन एक सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्यपदकांची लयलूट करीत कुस्ती स्पर्धेतील महाविद्यालयाची मक्तेदारी सिद्ध केली.
महाविद्यालयाचा विद्यार्थी हर्ष खंडागळे याने 61 किलो वजनी गटात सुवर्ण पदक तर शुभम म्हात्रे याने 74 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले. तसेच अंश धोंडसेकर व सुजीत पाटील या विदयार्थ्यांनी अनुक्रमे 86 किलो व 61 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळविले. सुमीत पाटील, रुचित भगत व सुदेश भगत या विद्यार्थ्यांनी देखील अंतीम फेरीमधे उत्तम टक्कर दिली. विद्यार्थ्यांच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील, प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला . विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारे जयेंद्र भगत, प्रमोद भगत, संघ व्यवस्थापक हर्षद टिवळेकर, क्रिडा विभाग प्रमुख श्री रविंद्र चिखले यांनाही या प्रसंगी गौरविण्यात आले.