सरकारी जागेचा परस्पर व्यवहार; दलाली करणार्‍यांविरोधात संघर्ष पेटला

अलिबाग-मुरुडच्या भूमाफिया नेत्याचा सहभाग; अन्यायाविरोधात लढणार्‍या शेकापच्या माजी सरपंचासह विद्यमान सरपंचांना अटक
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जंजिरा संस्थान काळापासून गुरुचरण असलेल्या व ग्रामपंचायत नावे जुनी नोंद असलेल्या सरकारी गुरचरणचा व्यवहार परस्पर करण्यात आला आहे. ही बाब समजताच शेकापसह स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त करीत संघर्ष सुरु केला.

सरकारी गुरचरण वाचवण्यासाठी शनिवारी (दि.4) गावकर्‍यांनी रस्त्यावर उतरून भांडवलदारांसह मध्यस्थी करणार्‍या सार्‍याच दलालांविरोधात आवाज उठविला. मात्र भांडवलदारांनी ग्रामस्थांचा आवाज दाबण्यासाठी पोलिसांची मदत घेतली. कायमच अन्यायाविरोधात आवाज उठविणार्‍या शेतकरी कामगार पक्षाने माघार न घेता संघर्ष सुरु ठेवला. त्यामुळे पोलिसांनी शेकापचे माजी सरपंच रमेश दिवेकर, विद्यमान सरपंच नीलिशा नरेश दिवेकर यांच्यासह माजी सरपंच मुसरद उलडे, उपसरपंच फैसल उलडे यांच्यासह अनेकांना अटक केली.

तळे- मुरुड तालुक्यातील विहूर गावांत समुद्राला लागून गुरचरण जागा आहे. हि जागा ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांना अंधारात ठेऊन गुपचूप व्यवहार करीत विकण्याचा घाट काही दलालांनी केला. हा गैरव्यवहार उघड होताच ग्रामस्थांचा संघर्ष सुरु झाला आहे. नागपूरमधील एका व्यावसायिकाने हा व्यवहार केल्याचे कळते. परंतु ग्रामपंचायत विहूरने याबद्दल सरकार दरबारीं आपली कायदेशीर लढाई सुरु केली. हे प्रकरण सरकार दरबारी असतानाही आज पोलीस बळाचा वापर करून ग्रामस्थांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला गेला. पण ग्रामस्थ पेटून उठले आणि शेकापच्या कार्यकर्त्यांसह सारेच रस्त्यावर उतरले.

Exit mobile version