सुहास पाटील यांच्याकडून प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे, हेमनगर परिसर कायमच काही ना काही कारणामुळे चर्चेत राहिला आहे. स्थानिक कार्यकर्त्याच्या हुकूमशाही धोरणामुळे ग्रामस्थदेखील दबावाखाली असल्याचा आरोप नाव न लिहिण्याच्या अटींवर काहींनी केला आहे. अशातच आता हेमनगरमधील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणामुळे पुन्हा एकदा स्थानिक कार्यकर्त्यांची सुरु असलेली मनमानी समोर आली आहे.

परिसरातील स्थानिक कार्यकर्त्यांच्या वरदहस्तामुळे सुहास पाटील या व्यक्तीने जागा मालकालाच अंधारात ठेवून जमिनीची परस्पर विक्री केली. याबाबत बांधकाम करण्यास प्रशासनाची परवानगी नसतानाही त्याठिकाणी बिनदिक्कतपणे बांधकाम सुरु असल्याचा आरोप सुनील पाटील यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविणाऱ्या सुहास पाटीलवर कारवाई करण्याची मागणी सुनील पाटील व कुटुंबियांनी केली आहे.
अलिबाग तालुक्यातील हेमनगर येथील गट नं. 115 ही कुळार्जीत मिळकत कै. काशिबाई खंडू पाटील यांच्या मालकीची असून, त्यांच्या मृत्यूनंतर वारसा हक्काने संरक्षित कुळ म्हणून प्रकाश पाटील, प्रशांत पाटील, सुनील पाटील, अलका पाटील, प्रतिभा पाटील यांच्या नावांची नोंद झाली. मात्र, स्थानिक कार्यकर्त्यांच्या वरदहस्तामुळे सुहास बाळाराम पाटील यांनी केवळ सातबाऱ्यावर नाव असल्याचा गैरफायदा घेत ती जागा हडप करुन परस्पर विक्री करण्याचा बेकायदेशीर प्रयत्न केला असल्याचा आरोप सुनील पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. तसेच सुहास पाटील यांनी प्रत्यक्ष ताबा दर्शविणारा सरकारी मोजणी नकाशा दाखल केल्याशिवाय कोणतीही विक्री परवानगी देऊ नये, अशी मागणी केली असताना सुहास पाटील यांनी परस्पर जमिनीचा व्यवहार करीत जागेत अनधिकृत बांधकामाला सुरुवात केली आहे. याबाबत तलाठी, ग्रामसेवक तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, तलाठीदेखील आर्थिक हितसंबंध जोपासण्याचे काम करीत असल्याचा आरोप पाटील कुटुंबियांनी केला आहे. याबाबत तलाठी अनिल ढोले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
1948 मध्ये माझ्या आजीच्या जागेवर संरक्षित कुळ आहे. ही जमीन सात एकर आहे. त्यापैकी दोन एकर जमीन आई, वडिलांनी कोल्हापूर संस्थानाला दिली. उर्वरित जागेत तीन भावांचे राहते घर आहे. त्यावर ग्रामपंचायत घरपट्टी आहे. घराच्या मागील असलेल्या मोकळ्या जागेमध्ये चिखली येथील सुहास पाटील यांनी बेकायदेशीररित्या बांधकाम केले. त्यांच्याविरोधात तहसीलदारांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असतानाही बांधकाम होत असल्याने मोठा प्रश्न निर्माण होत आहे.
सुनील पाटील, अन्यायग्रस्त ग्रामस्थ