| पाली | प्रतिनिधी |
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तारखा अजून जाहीर व्हायच्या आहेत. मात्र असंख्य इच्छुक उमेदवारांनी यासाठी आत्तापासूनच कंबर कसली आहे. अनेकांनी थेट समाज माध्यमांवर आपणच इच्छुक उमेदवार असल्याचे जाहीरदेखील केले आहे. शिवाय रोजच्या रोज यासंदर्भात आपल्या कामांच्या पोस्ट, तसेच विविध फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत. समाज माध्यमांवर अशा इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी पहायला मिळत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्यालाच तिकीट मिळावे यासाठी हे उमेदवार समाज माध्यमांचा अतिशय प्रभावीपणे वापर करताना दिसत आहेत. या माध्यमातून ते आपली लोकप्रियता आणि जनतेच्या मनाचा कौलदेखील तपासत आहेत. शिवाय पक्षश्रेष्ठींपर्यंत आपल्या मनातील इच्छा या माध्यमातून पोहोचवली जात आहे.
काहींनी तर स्वतःला दादा, भाऊ, साहेब व शेठ अशा उपाधीदेखील लावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या पोस्टला येणाऱ्या कमेंट्स विनोदीदेखील पाहायला मिळतात. परिणामी, अनेकांचा विरंगुळादेखील होतो. काही उमेदवारांनी तर आपल्यालाच तिकीट मिळणार असे समाज माध्यमांवर थेट जाहीरच करून टाकले आहे. तर काहींनी उमेदवारी न मिळाल्यास बंडाची भाषा देखील केली आहे. तर या इच्छुक उमेदवारांचे कार्यकर्ते व चेले चपाटेदेखील या पोस्ट विविध माध्यमात शेअर करताना दिसत आहेत.
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
निवडणुका गाव-खेड्यातील असल्या तरी प्रचारासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर सर्वाकडूनच होताना दिसतो. इच्छुक उमेदवारांनी डिजिटल बॅनर व व्हिडिओ तयार केले आहेत. ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. शिवाय, पाच वर्षांतील कामांचा लेखाजोखाही समाज माध्यमावर मांडला जात आहे.
मनोरंजन व वाद
सत्तेत असताना किंवा नसताना केलेली कामे, राबविलेल्या योजना व उपक्रम यांचे फोटो, व्हिडिओ व माहिती प्रसारित केली जात आहे. याशिवाय अनेकजणांनी आपला अजेंडाही समाज माध्यमावर प्रसारित करत आहेत. यावर चांगल्या-वाईट प्रतिक्रिया उमटत आहेत. काही उमेदवार व कार्यकर्ते समाज माध्यमांद्वारे तत्कालीन सत्ताधाऱ्यांचा भ्रष्ट कारभार समोर आणत आहेत. या सगळ्यात सर्वसामान्य नागरिक व मतदारांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. मात्र काही वेळेला समाज माध्यमांवरील वाद शिगेलाही जात आहे.
