| पनवेल | प्रतिनिधी |
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा (एमआयडीसी) कडून निविदा राबवल्यानतंर काँक्रिटीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याची माहिती एमआईडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. आता लवकरच येथील अंतर्गत रस्ते चकाचक होणार आहेत.
तळोजा औद्योगिक वसाहतीमधून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले आहे. अंतर्गत रस्ते मात्र डांबराचे आहेत. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या रस्त्यांचे काँक्रिटीकरण व्हावे, अशी मागणी तळोजा इंडस्ट्रियलिस्ट असोशियन (टीआयए) मार्फत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे करण्यात आली होती.
24 जूनला तळोजा येथे झालेल्या बैठकी दरम्यान औद्योगिक वसाहतीमधिल अंतर्गत रस्ते काँक्रीटचे करा असा आदेश उद्योगमंत्र्यांनी दिला होता. उद्योग मंत्र्यांच्या आदेशा नंतर अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालानंतर रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी निविदा प्रक्रीया सुरु असल्याची माहिती एमआईडीसी चे अधिकारी दीपक बोबडे-पाटील यांनी दिली आहे.