महायुतीत ‌‘गृहकलह’

| मुंबई | प्रतिनिधी |

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 विधान परिषद जागांची निवडणूक जाहीर करताच महायुतीमध्ये अंतर्गत जागावाटपावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. विशेषतः कोकण स्थानिक स्वराज्य संस्था (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) आणि पुणे स्थानिक स्वराज्य संस्था या दोन जागांवरून महायुतीतील मित्रपक्षांमध्ये उमेदवारीवरून उघड चढाओढ सुरू झाली आहे. बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे जागांवर हक्क नेमका कोणाचा, यावरून वरिष्ठ पातळीवर मोठी रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार राजन साळवी यांच्या नावाची मोठी चर्चा आहे. राजन साळवी यांनी यापूर्वीच या निवडणुकीच्या अनुषंगाने आखणी सुरू केलीय. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे हे त्यांचा मुलगा अनिकेत तटकरे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी आग्रही आहेत. मात्र, राजन साळवी यांनी या जागेवर थेट दावा ठोकला आहे.

दुसरीकडे, माजी आमदार अनिल भोसले यांची 2022 पासून रिक्त राहिलेली पुण्याची जागा स्वतःकडे राखण्याचे मोठे आव्हान अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर आहे. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणात भारतीय जनता पक्षाने या जागेवर आपला आक्रमक हक्क सांगायला सुरुवात केल्याने पुण्यात महायुतीत मिठाचा खडा पडण्याची चिन्हे आहेत.

Exit mobile version