आंतरराष्ट्रीय आगरी साहित्य संमेलन होणार थायलंडला

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
आगरी सामाजिक संस्था अलिबागतर्फे आंतरराष्ट्रीय आगरी साहित्य संमेलन रविवारी (दि. २६ जून २०२२) थायलंड देशातील बँकॉक येथे आयोजित करण्यात आले आहे. दिनानाथ पाटील हे या आंतरराष्ट्रीय आगरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. कादंबरीकार कैलास पिंगळे हे स्वागताध्यक्ष असून डॉ.जगदीश थळे यांच्या शुभहस्ते आगरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

परिसंवाद हे या संमेलनाचे खास वैशिष्ट्य असणार आहे. ‘मराठी भाषा परदेशात पोहोचलीच पाहिजे’ या विषयावर परिसंवाद होणार असून प्रा.प्रकाश पाटील व कविवर्य पी.के.म्हात्रे हे परिसंवादाचे पुष्प गुंफणार आहेत. यावेळी कवी जगदीश थळे लिखीत ‘अंकुर ‘ या नावाचे काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात येणार असून आगरी बोली भाषेतील कवितांवर आधारित आगरी बोलीचा जागर या नावांने कवितेचा कार्यक्रमदेखील होणार आहे. तसेच महिलांचे आगरी भवरनृत्य सादर केले जाईल. सुनीता प्रकाश पाटील (पेझारी), रवींद्र चांगू पाटील (नवीन बांधण) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. नाट्य अभिनेते प्रकाश ज. पाटील यांच्याकडे संमेलनाचे सूत्रसंचालन असणार आहे. अत्यंत उत्साहाने थाटामाटात अलिबागच्या आगरी बांधवांचे साहित्य संमेलन थायलंडमध्ये साजरे होणार आहे. अलिबागची आगरी सामाजिक संस्था उपक्रमशील संस्था असून ही संस्था दरवर्षी सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक उपक्रम आयोजित करुन समाजाच्या भल्यासाठी कार्यरत असते. यावर्षी आगरी संस्थेने आंतरराष्ट्रीय स्तरावर साहित्य संमेलनाच्या रुपाने उपक्रम सादर करुन एक पाऊल पुढे टाकले आहे. याबद्धल अनेक गुणी जनांनी आगरी संस्थेला शाबासकी दिली आहे.

Exit mobile version