| कर्जत | प्रतिनिधी |
श्री समर्थ कृपा सेवाभावी सामाजिक संस्था (छत्रपती शिवाजी महाराज नगर, दहिवली) संचालित द्वारकाई विशेष मुलांची शाळा यांच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी विविध मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी दहिवली विचार मंचला विशेष आमंत्रण देण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुनिल जाधव, मार्गदर्शक विकास चित्ते, मनीषा ढुमणे, मल्हारी माने, जयप्रकाश जाधव उपस्थित होते.
या शाळेतील विशेष मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संचालक सागर पवार आणि त्यांची उत्कृष्ट टीम अत्यंत मनापासून कार्यरत आहे. मुलांना इतरांवर अवलंबून न राहता स्वावलंबी बनवणे, दैनंदिन कृती स्वतः करण्याचे कौशल्य विकसित करणे, ही त्यांची ध्येयधोरणे आहेत.
बौद्धिक विकासासोबतच शारीरिक शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन या मुलांना विविध उपक्रमांद्वारे प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे ही मुले सर्वसामान्य मुलांप्रमाणे आत्मविश्वासाने वागू शकतील, समाजात आपले स्थान निर्माण करू शकतील, यासाठी ही टीम अखंड प्रयत्नशील आहे.







