खानावळे येथील उपकेंद्राचा गौरव; नवीन शाखा कार्यालयाचेही उद्घाटन
| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात महावितरणच्या उपकेंद्राला प्रथमच आयएसओ 9001:2015 हे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे. पनवेल ग्रामीण विभागांतर्गत गोदरेज सिटी, खानावळे येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या 20 एमव्हीए क्षमतेच्या 33/22 किलोव्होल्ट उपकेंद्राला हा बहुमान मिळाला आहे. कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे यांच्या हस्ते सोमवारी (दि.19) मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी नवीन उपकेंद्रासह खानावळे येथील शाखा कार्यालयाचेही उद्घाटन करण्यात आले.
पनवेल परिसरात झपाट्याने नागरीकरण होत असून, नवीन गृहप्रकल्प आणि विविध विकासकामांमुळे विजेची मागणी वाढण्याची शक्यता आहे. ही गरज लक्षात घेऊन उभारण्यात आलेले उपकेंद्र परिसरातील वीजपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यास मदत करणार आहे. वाढत्या वीजवापराचे नियोजन आणि ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी या उपकेंद्राचे महत्त्व वाढले आहे.
महावितरणच्या भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी नवीन वीज उपकेंद्रांची उभारणी करण्याबरोबरच त्यांची योग्य देखभाल करणे आवश्यक असल्याचे सांगितले. विद्युत सुरक्षेच्या नियमांचे पालन, योग्य अर्थिंग, नियमित नोंदी आणि ऊर्जेचे परीक्षण याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्ह्यात आगामी काळात मोठ्या प्रमाणावर विकास होणार असून, त्यासाठी अखंडित वीजपुरवठा महत्त्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला पेण मंडलाचे अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड, पनवेल ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता दिवाकर देशमुख यांच्यासह महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या मानांकनामुळे गुणवत्ता व्यवस्थापन आणि ग्राहकसेवेच्या दृष्टीने महावितरणच्या रायगड जिल्ह्यातील कामकाजात महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
मानांकन मिळवणे आव्हानात्मक असले, तरी ते टिकवून ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने आपलेपणाच्या भावनेतून काम करून व्यवस्थेची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
दिलीप जगदाळे






