गेले काही महिने सुरू असलेल्या पाच विधानसभांच्या निवडणूक प्रक्रियेला गुरुवारी त्याच्या निकालाने पूर्णविराम मिळाला आहे. या निकालांबद्दल उत्सुकता कमालीची ताणली गेली होती आणि त्याबाबत अनेक दावे प्रतिदावे केले जात होते. तथापि, हे निकाल जवळपास सर्व अंदाज आणि आडाखे बाजूला सारत सर्वांना चकित करून सोडणारे ठरले आहेत. पाचपैकी चार राज्यांबाबत अंदाज चुकले असून यात उत्तरप्रदेश आणि पंजाब या दोन बहुचर्चित राज्यांच्या निकालाची चर्चा सर्वत्र आहे. सर्वाधिक चर्चेच्या आणि येत्या सार्वत्रिक निवडणुकींवर मोठा परिणाम करणार्या उत्तरप्रदेश विधानसभेत भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार हे निश्चित झाले असून गेल्या तीन दशकांतील तेथील राजकीय निकालांचा इतिहास त्यांनी बदलला आहे. एका पक्षाला सलग दोनदा सत्ता तेथे गेल्या तीस वर्षांत मिळालेली नाही. यावेळी योगी आदित्यनाथ हे सलग दुसर्यांदा मुख्यमंत्री होतील आणि हा इतिहास बदलून जाईल. बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांतून भाजपाला यश मिळेल असे सूचित केले असले तरी काहींनी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षालाही सत्ता मिळू शकेल किंवा त्यांना दीडशे ते पावणेदोनशे जागा मिळू शकतील असा अंदाज व्यक्त केला होता. तोही फोल ठरला. तसेच पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला सत्ता मिळू शकेल असा अंदाज होता तर काही काँग्रेसला तेथे यश मिळू शकेल असा अंदाज व्यक्त करीत होते. मात्र तेही आडाखे चुकीचे ठरवत ‘आप’ने तेथे निर्विवाद बहुमताकडे वाटचाल करत अन्य सर्व पक्षांना केराची टोपली दाखवली आहे. गोव्यात भाजप सलग दहा वर्षे सत्तेत असल्याने आणि गेल्या वेळी सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून काँग्रेस निवडून येऊनही घोडेबाजार करून भाजप सत्तेवर आल्याच्या पार्श्वभूमीवर तेथे काँग्रेसला यश मिळेल असा अंदाज होता, तोही फोल ठरला. तेथे तसेच उत्तराखंड मध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण होईल असे मतदानोत्तर चाचण्या सांगत होत्या. पंजाबमध्ये काँग्रेस पक्षात जो काही महिने सुरू असलेला तमाशा ज्यांनी पाहिला असेल, त्यांना या निकालाचे आश्चर्य वाटणार नाही. खरे आश्चर्य उत्तर प्रदेशच्या निकालाबद्दलच आहे. तथापि, प्रसारमाध्यमांतून न दिसलेल्या काही घटकांनी योगींना पुन्हा सत्ता मिळवून दिली आहे. त्यापैकी महत्त्वाचे आहे ते महिलांनी केलेले मतदान. योगी यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या मोफत धान्य योजनेमुळे महिलांनी मोठ्या प्रमाणात त्यांना मतदान केले. पुरुषांच्या तुलनेत काही ठिकाणी हे प्रमाण दहा टक्क्यांहून अधिक होते. प्रसारमाध्यमांतून गंगेच्या पात्रात वाहात येणारी प्रेते दिसली, परंतु तेथे उपासमारीतून वाचवण्यासाठी केलेल्या या सेवेची चर्चा झाली नाही. त्यामुळे हा निकाल धक्कादायक वाटतो. शिवाय सर्व यंत्रणांचा मनमानी वापर हे कारणही आहेच. आता देशाच्या राजकारणात येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंतचा नवा अध्याय सुरू होईल. सध्या बलाढ्य रशियाशी धैर्याने लढणारे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष हे आधी स्टँडअप कॉमेडियन होते याची जशी चर्चा आहे, तसे पंजाबमध्ये मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार असलेले भगवंत मान हे देखील स्टँडअप कॉमेडियन असल्याने त्यांच्याही कामगिरीची चर्चा त्या दृष्टीने होईल. आप पुढे कशी वाटचाल करतो ते कळेल. योगी आदित्यनाथ यांच्यासाठी हा विजय केवळ दुसर्यांदा मुख्यमंत्री इतका मर्यादित नाही तर नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी असेही त्यांना मानले जात असल्याने, त्याला आता किती मूर्त रूप लाभते ते पाहता येईल. काँग्रेस पक्षासाठी ही नेहमीप्रमाणे आत्मपरीक्षणाची वेळ असून ते वास्तवापासून किती लांब आहेत आणि विश्वासार्ह विरोधक म्हणून उभे राहण्यासाठी काय करावे लागेल, याचा धांडोळा घ्यावा लागेल. त्यात त्यांची पक्षांतर्गत रचना, तरुण आणि वृद्ध नेत्यांतील संघर्ष तसेच सत्तारूढ भाजपाकडून उद्ध्वस्त केल्या जात असलेल्या लोकशाही संस्थांच्या रक्षणासाठी ते काय करतात याही गोष्टी अंतर्भूत आहेत. बहुसंख्य जनता आलेला निकाल स्वीकारते कारण त्यात त्याच्या जीवनावर परिणाम होण्यासारखे काही आहे, याची त्यांना खबर नसते. जे सजग नागरिक आहेत त्यांनी मुळात या निवडणुका निष्पक्षपातीपणाने झाल्या का याचा विचार करण्याची गरज आहे. निवडणूक आयोगच मुळात निष्पक्षपाती नसला आणि सत्तारूढ केंद्र तसेच राज्य सरकारकडून अन्याय्य पद्धतीने विविध यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांसाठी असमान मैदान निर्माण केले तर त्याचे दूरगामी परिणाम काय, यावरही देशातील नागरिकांनी विचार करण्याची ही वेळ आहे.