| पनवेल | प्रतिनिधी |
महाराष्ट्रातील सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून पनवेल विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो. 2019 मध्ये या विधानसभा क्षेत्रात पाच लाख 57 हजार मतदार संख्या होती. त्यात नव्याने नऊ हजार 671 मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत वाढलेल्या मतदारांमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यतेने उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतिम मतदार यादी शुक्रवारी प्रसिद्ध होणार होती. निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम पाठवला आहे. तसेच कुणीही मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी आता 22 जानेवारीपर्यंत मुदत वाढवली आहे. त्यामुळे 22 जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे; पण सुधारित मतदार यादीत पनवेलमध्ये अवघे नऊ हजार 671 मतदार वाढले आहेत. यामध्ये 3 लाख 4 हजार 118 पुरुष मतदार, दोन लाख 62 हजार 487 स्त्री मतदार व 66 तृतीयपंथीय मतदारांची नोंद झाली आहे. मतदारांची वाढलेली संख्या आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण आहे. कारण निवडणुकीत मतदार यादी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याअनुषंगाने निवडणूक आयोगाने मतदार यादीचे काम सुरू केले होते.
नवमतदारांसाठी आयोगाची मुदतवाढ
प्रारूप मतदार यादी ऑक्टोबर महिन्यात प्रसिद्ध केली होती. डिसेंबरपर्यंत दावे व हरकती मागवल्या होत्या. तसेच 26 डिसेंबरपर्यंत दावे, हरकती निकाली काढणार होत्या; तर मतदान यादी प्रसिद्धीसाठी 1 जानेवारीपर्यंतची मुदत आयोगाने दिली होती; तर 5 जानेवारीला मतदार यादी अंतिम केली जाणार होती. या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. 18 वर्षे पूर्ण झालेला एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, याची काळजी निवडणूक आयोग घेत आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादी आता 22 जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे.
मतदार नोंदणीकडे पाठ
ज्यांची छायाचित्रे मतदार यादीत नाहीत, त्यांना रंगीत छायाचित्र जमा करण्याच्या आवाहन तहसीलदार कार्यालयाकडून करण्यात आले होते. त्यानुसार नावनोंदणी, दुरुस्ती, दुबार नाव दुरुस्ती करून घेण्यासाठी संबंधित तहसील, केंद्रस्तरीय अधिकारी, तहसीलदार विभागाने विविध कार्यक्रम राबवले होते. विधानसभा मतदार यादीमधील 46 हजार 66 मतदारांचे फोटो नसल्याने वर्तमानपत्रांमधून छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी प्रसिद्ध केली होती. असे असताना मतदान नोंदणीसाठी मतदारांनी उत्सुकता दाखवली नसल्याचे दिसून आले आहे.
निवडणुकीचे पडघम
आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजल्याने राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीसाठी प्रशासनाकडूनही तयारी केली जात आहे. मतदार यादीवरील आक्षेप नवीन मतदार नोंदणी, याशिवाय मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यंदा निवडणुकीत एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, तसेच दोन वेळा नाव असलेले मतदार, मयत मतदार वगळण्याची मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता अंतिम मतदार यादीकडे लागल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतिम मतदार यादीची मुदत वाढवण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने सुधारित कार्यक्रम पाठवला आहे. कुणीही मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी 22 जानेवारीपर्यंत मतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवणे गरजेचे आहे.
विजय पाटील, तहसीलदार, पनवेल
पनवेल हे विकसित होणारे शहर असल्याने येथे स्थलांतरित मतदारही मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना काळात मोठ्या प्रमाणात अनेक जण स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे नव्याने नोंद होणाऱ्या मतदारांचा कौल राजकीय समीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
बाळाराम पाटील, माजी आमदार, शेकाप