शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली
| गोवे-कोलाड | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यात गेली चार-पाच दिवस खूप मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असल्याने नद्या, नाले, धरणे तुडुंब भरून वाहू लागल्याने तसेच अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, खांब धामणसई परिसरातील शेकडो हेक्टर शेत जमीन पाण्याखाली गेल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
कोलाड पाटबंधारेच्या आडमुठेपणाच्या धोरणांमुळे व त्यांच्या गलथान कारभारामुळे खांब धामणसई परिसरातील कालव्याखालील खरिपातील भात लावणी केलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे. गेली बारा-तेरा वर्षे कुंडलिकेचा उजवा तीर तसेच डावा तीर कालवा हा दुरुस्तीच्या नावाखाली आहे, यावर जलसंपदा खात्याने करोडो रूपये खर्च केले, परंतु, उन्हाळी पाणीच नाही तर केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पावसाळी पिकांच्या होत असलेल्या हानीला हे पाठबंधारे खातेच जबाबदार असल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
काही महिन्यांपूर्वी या कालव्यावर उडदवणे येथे कालव्याच्या दुतर्फा संरक्षण भिंतीचे बांधकाम केले गेले. त्यामुळे अधिक मोठा धोका देवकान्हे पालदाड मार्गावर झाला असून, रस्तादेखील वाहून गेला आहे. तर, वाहून गेलेला रस्ता सदरील शेतकरी यांच्या शेतात गेल्याने खूप प्रमाणावर त्यांचे नुकसान झाले आहे. तसेच, दोन विद्युत खांबानादेखील धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, पाणी भात शेतीत घुसल्याने काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेताला खांडी जाऊन अनेक शेतकऱ्यांचे लावणीसाठी खणून ठेवलेले रोप वाहून गेले, तर काही जमीन पाण्याखाली गेल्याने पूर्णतः लागवड केलेली भातशेती वाया गेली आहे.
कोलाड पाटबंधारे खात्याच्या आडमुठेपणाच्या धोरणांमुळे कालव्याचे पाणी कालवा पलटी होऊन थेट शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे. त्यामुळे झालेले नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी सर्व शेतकरी वर्गातून केली जात आहे.
अनिल महाडिक