शिवसेना ठाकरे गटाच्या शहरप्रमुखांचे उपोषण
| म्हसळा | प्रतिनिधी |
भेकऱ्याचा कोंड रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली असतानाही चौकशी होत नाही. तात्काळ चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख विशाल सायकर यांनी येथील तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.
या रस्त्याच्या निकृष्ट झालेल्या कामाची तातडीने चौकशी व्हावी, आणि तो रस्ता पुन्हा बनवण्यात यावा, अशी मागणी विशाल सायकर यांनी केली होती. ती न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र, तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी आजपर्यंत कसलीही कारवाई केली नाही. पण, चौकशीही केली नाही. त्यामुळे दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे सायकर हे मंगळवारपासून येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. संबंधितांवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे सायकर यांनी सांगितले. या आंदोलनाला राष्ट्रवादी शरद पवार गट श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष अजहर धनसे आणि अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.






