कृष्णा खोरे विकास महामंडळातील गैरव्यवहाराची चौकशी करा

मनसे अभियंता व कंत्राटदार संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत येणाऱ्या कृष्णा खोरे विकास महामंडळात कार्यरत असलेले संचालक डॉ. हनुमंत धुमाळ यांच्या कार्यकाळात प्रचंड अनागोंदी आणि गैरव्यवहार झाला असल्याचा संशय मनसे अभियंता आणि कंत्राटदार संघटनेने व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संघटनेतर्फे मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

संघटनेचे अध्यक्ष गौरव वालावलकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, डॉ. धुमाळ यांना सलग दोन वेळा सेवा विस्तार देण्यात आला आहे. या सेवा विस्तारामागे नेमके काय रहस्य आहे, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. याआधीही कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक बड्या कंत्राटदारांनी आपले राजकीय लागेबांधे वापरून, कोणतीही अर्हता नसताना हजारो कोटींची कामे मिळवली आणि स्वतःची तिजोरी भरली, असा आरोपही संघटनेने केला आहे.

नुकतेच राज्यभरातील शासकीय कंत्राटदारांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करून अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना द्याव्या लागणाऱ्या 7% ते 56% टक्केवारीबद्दल तक्रार केली होती. तसेच, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली येथील कार्यक्रमात काहीतरी ठेवल्याशिवाय कामे दिली जात नाहीत, त्यामुळे कंत्राटदार मारला जातो, असे वक्तव्य करून एकप्रकारे शासनातील भ्रष्टाचाराची कबुलीच दिली आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

जलसंपदा मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातूनच या सर्व व्यवहारांची सूत्रे हलवली जात असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा आणि सलग दोनदा सेवा विस्तार मिळालेल्या डॉ. धुमाळ यांच्या संपूर्ण कार्यकाळातील कामांची नि:पक्षपाती चौकशी करावी, अशी मागणी मनसे अभियंता आणि कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष गौरव वालावलकर, कार्याध्यक्ष अवधुत चव्हाण आणि सरचिटणीस अमित शिंदे यांनी केली आहे.

Exit mobile version