। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
फुटबॉल दिग्गज डिएगो मॅराडोना यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी मंगळवारपासून पुन्हा सुरू झाली आहे. त्यांच्या वैद्यकीय पथकावर योग्य उपचार न केल्याचा आणि निष्काळजीपणा केल्याचा आरोप आहे. मे 2025 मध्ये सुरू झालेला पहिला खटला त्यावेळी रद्द करण्यात आला होता, जेव्हा एका न्यायाधीशावर कोर्टात परवानगीशिवाय माहितीपट शूट केल्याचा आरोप लागला होता. आता नवीन न्यायाधीशांसमोर सुनावणी सुरू होईल.
मॅराडोना यांना फुटबॉल इतिहासातील महान खेळाडूंपैकी एक मानले जाते. त्यांनी 1986 च्या विश्वचषकात अर्जेंटिनाला विजय मिळवून दिला होता आणि ‘हँड ऑफ गॉड’ गोलसाठीही ते ओळखले जातात. मॅराडोना यांचा 25 नोव्हेंबर 2020 रोजी वयाच्या 60 व्या वर्षी मृत्यू झाला होता. ते मेंदूतील रक्ताच्या गुठळीच्या शस्त्रक्रियेनंतर घरी बरे होत होते. शवविच्छेदनात हृदयविकाराचा झटका आणि फुफ्फुसात पाणी जमा होणे हे मृत्यूचे कारण सांगितले गेले.
या प्रकरणात मेडिकल टीमचे 7 सदस्य खटल्याचा सामना करत आहेत. त्यांच्यावर ‘कल्पेबल होमिसाईड’चा गुन्हा दाखल आहे. दोषी आढळल्यास त्यांना 8 ते 25 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. तपासात समोर आले की, टीमला मॅराडोनाच्या गंभीर स्थितीची माहिती होती, परंतु त्यांनी आवश्यक पावले उचलली नाहीत. मेडिकल तज्ञांनी त्यांच्या उपचारांना ‘निष्काळजी आणि अपुरे’ असे म्हटले. खटल्यात सुमारे 100 साक्षीदारांचे जबाब घेतले जातील, ज्यात त्यांच्या मुलींचाही समावेश आहे. ही सुनावणी जुलैपर्यंत चालू शकते.
मॅराडोनाने फुटबॉल कारकिर्दीत 312 गोल केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 91 सामने खेळले, ज्यात 34 गोल केले. मॅराडोना बार्सिलोना, नेपोली, सेव्हिला, नेवेल्स ओल्ड बॉईज आणि बोका ज्युनियर्स यांसारख्या क्लबकडून खेळले आहेत. बार्सिलोनाकडून खेळताना त्यांनी 36 सामन्यांत 22 आणि नेपोलीसाठी 188 सामन्यांत 81 गोल केले.
मॅराडोनाने कारकिर्दीत 11 स्पर्धा जिंकल्या आहेत. यात 1 वर्ल्ड कप विजेतेपद, एक कप विजेतेपद, एक नेशन्स लीग, एक वर्ल्ड यूथ चॅम्पियनशिप आणि 5 राष्ट्रीय कप जिंकले आहेत. मॅराडोनाला फिफा प्लेयर ऑफ द सेंच्युरीनेही सन्मानित करण्यात आले आहे. त्याने एकदा वर्ल्ड कप गोल्डन बॉल, एकदा बॅलन डीफओर, दोनदा साऊथ अमेरिकन फुटबॉलर ऑफ द इयर आणि सहा वेळा नॅशनल लीग टॉप स्कोरर अवॉर्ड जिंकला आहे.







