सूरज मिसाळच्या मृत्यूची चौकशी सुरु

। अलिबाग । प्रतिनिधी ।

कर्तव्य बजावत असताना महावितरण कर्मचारी सूरज मिसाळ या तरुणाचा मंगळवारी सायंकाळी अपघाती मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलीस प्रशासनासह महावितरण कंपनीचे कर्मचारी कामाला लागले आहे. सूरजच्या मृत्यूची चौकशी महावितरण कंपनीच्या विद्युत निरीक्षकांमार्फत सुरु करण्यात आली आहे.

सूरज मिसाळ हा तरुण गेल्या नऊ वर्षांपासून महावितरण कंपनीत वायरमन म्हणून काम करीत होता. यापूर्वी तो एसटी महामंडळमध्ये नोकरीला होता. त्यानंतर 2014 मध्ये तो महावितरण कंपनीत वायरमन म्हणून रुजू झाला. सुरुवातीचे दोन ते अडीच वर्षे कंत्राटी कामगार म्हणून त्याने सेवा केली. त्यानंतर 2017 मध्ये कायम सेवेत त्याला घेण्यात आले. तो, त्याची पत्नी, दोन वर्षाचा मुलगा, आई असा त्याचा परिवार आहे. या नोकरीतून तो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होता. मंगळवारी सायंकाळी विद्यानगर परिसरातील सिगल गृहनिर्माण सोसायटीसमोरील विद्युत तार जोडण्यासाठी तो व त्याचा सहकारी शैलेश मते असे दोघेजण वीज खांबावर चढले. थळवरून येणार्‍या विद्युत तारा जोडण्याचे तो काम करीत होता. दरम्यान, अचानक विजेचा झटका लागून तो जागेवरच मृत पावला.

सूरजच्या मृत्यूने सुतारपाडा गावात शोककळा पसरली आहे. सूरजच्या मृत्यूनंतर महावितरण कंपनीचे विद्युत निरीक्षक कामाला लागले आहेत. सूरजच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तज्ज्ञ अलिबागमध्ये दाखल झाले आहेत. या तज्ज्ञांमार्फत घटनास्थळी जाऊन पाहणी करणे, घटनाक्रमाची माहिती घेणे आदी काम सुरु करण्यात आल्याची माहिती महावितरण कंपनीकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version