। अलिबाग । वार्ताहर ।
कोकण मराठी साहित्य परिषदेचा साहित्य प्रथम पुरस्कार रमेश प्रभाकर धनावडे यांच्या ‘कवितेच्या सुरातून’ या पुस्तकावर जाहीर झाला होता. पद्मश्री मधुभाई मंगेश कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार रमेश धनावडे यांनी रत्नागिरी-मालगुंड येथे स्वीकारला आहे.
यावेळी उदय निरगुडकर, विश्वस्त प्रमुख रमेश कीर, केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, कोमसाप रायगड अध्यक्ष सुधीरभाई शेठ आदी मान्यवर तसेच अनेक साहित्यप्रेमी उपस्थित होते. कवी केशवसुसुतांचे जन्मस्थळ असलेल्या वास्तुत हा कार्यक्रम संपन्न झाला. कोकण मराठी साहित्य परिषदेकडून सन्मानित झालेल्या या पुरस्काराबद्दल समाजातील सर्व स्तरांमधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रमेश धनावडे यांनी आजवर त्यांचे मनतरंग काव्यसंग्रह, ऊर्मी चारोळी संग्रह, जीवनगाणे ललितलेख संग्रह, कवितेच्या सुरातून हा लेखसंग्रह ही पुस्तके प्रकाशित आहेत. यावेळी कवितेच्या सुरातून या पुस्तकामध्ये साडेआठशे वर्षापूर्वीचे संतकवी ते आजवरल्या कवींची अशी एकूण 63 प्रथितयश साहित्यिक कवींची यशोगाथा त्यांनी अधोरेखित केली आहे. एकाच पुस्तकामध्ये एवढ्या सगळ्या कवींना एकत्र घेऊन त्याने हा एक 316 पानांचा ऐतिहासिक दस्तावेज तयार केला आहे. त्यामुळेच अल्पावधीतच हे पुस्तक रसिकांच्या पसंतीस उतरले आहे.