पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते उद्घाटन
| खोपोली | प्रतिनिधी |
शहराची वाढती लोकसंख्या तसेच अनेक छोटे-मोठे गुन्हे घडत असताना पोलीस ठाण्यात होणार्या गर्दीदरम्यान सर्वांचे म्हणणे नीट ऐकून घेण्यासाठी तपासी अंमलदार कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या नूतनीकरण करण्यात आलेल्या कक्षाचे उद्घाटन रायगडचे अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर संजय शुक्ला, खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरिष पवार यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
खोपोली पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक पदाचा धुरा पोलीस अधिकारी शिरिष पवार यांनी घेतल्यानंतर खोपोली शहरातील कायदा सुव्यवस्था नीट ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक शिरिष पवार व त्यांच्या सर्व सहकारी वर्गानी मोठी मेहनत घेतली आहे. पोलीस निरीक्षक पवार हे कायदा सुव्यवस्था नीट ठेवण्याबरोबर पोलीस ठाणे परिसरातील गोरगरिबांना मदतीचा हात देत सामाजिक बांधीलकी ही जपण्याचे कार्य ही करीत आहेत. त्याचबरोबर खोपोली पोलीस ठाण्याचा चेहरामोहरा बदलला आहे. तपासी अंमलदार यांना प्रशस्त कक्ष तयार व्हावे ज्या कक्षातून काम करताना त्यांना प्रसन्न वाटावे आणि त्यांच्या तपास कामात वेगाने बदल व्हावा या हेतूने कक्षाचे नूतनीकरण करण्यात आले आहे.