मालवाहू डंपरमधून पडणारी खडी धोकादायक
| नागोठणे | वार्ताहर |
डोलवी पेण येतील जेएसडब्ल्यू कंपनीच्या धरमतर येथील जेट्टीवर उतरण्यात येणार्या कच्च्या लोखंड असलेल्या खडीची (गोटी) डंपरमधून नागोठणे, भिसे खिंडमार्गे जेएसडब्ल्यूच्या साळाव येथील प्लांटमध्ये वाहतूक करण्यात येत आहे. त्यानंतर तेथे या खडीवर प्रक्रिया करुन पुन्हा ती खडी कंपनीच्या डोलवी येथील प्लांटमध्ये पक्का माल तयार करण्यासाठी आणण्यात येत आहे. मात्र, या वाहतुकीमध्ये काही वेळा ही खडी डंपरमध्ये ओव्हरलोड भरण्यात येत असल्याने ती रस्त्यावर पडत आहे. त्यामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, कच्चे लोखंड असलेली ही खडी नागोठणे जवळील, वेलशेत फाटा, वरवठणे फाटा, भिसे, मेढा नाका तसेच नागोठणे-रोहा मार्गावर अनेक ठिकाणी पडल्याचे बुधवारी (दि. 8) सकाळी दिसून आले आहे. ही खडी मोठ्या प्रमाणात पडल्याने वाहने घसरून अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जेएसडब्ल्यू कंपनीच्या या ओव्हर लोडेड डंपरचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. असे असतानाही पेण आरटीओने या प्रकाराकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. या ओव्हरलोड डंपरवर कारवाई करण्यासाठी पेण आरटीओ कार्यालयातील अधिकारी एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहात आहेत का, असा प्रश्न प्रवासी व वाहनचालकांतून उपस्थित करण्यात येत आहे.
नागोठणे रोहा रस्त्यावर खडी पडल्याचे दिसल्याने रस्त्यावर वाहने संथ गतीने चालविण्यात येत होती. मात्र, हीच खडी जर रात्रीच्या वेळी पडली असती, तर खडी पडल्याचे लक्षात न आल्याने या मार्गावरूनच रोहा व नागोठण्याकडे येणारे अनेक दुचाकीस्वार घसरून अपघात घडण्याचा धोका निर्माण झाला असता. त्यामुळे जेएसडब्ल्यू कंपनीच्या या ओव्हर लोडेड डंपरवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे.