खड्डेच खड्डे व बेशिस्त अनधिकृत वाहनांची पार्किंग
| रेवदंडा | वार्ताहर |
प्रवासीवर्गाचे जिव्हाळयाचे असलेले रेवदंडा एसटी बसस्थानक आवारात पडलेले मोठे खड्डे व स्थानकांच्या आवारात बेशिस्तीने केलेली वाहन पार्किंग यामुळे अपघातास निमंत्रण ठरत आहे. भविष्यात यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
रेवदंडा एस.टी. बसस्थानक अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्याला मध्यवर्ती ठिकाण आहे. नित्याने तिन्ही तालुक्यांत येथून एसटी बसेस जा-ये करत असतात. येथूनच मुुंबई, पुणे, ठाणे, शिर्डी आदी महाराष्ट्रात मुरूड एसटी डेपोच्या दूरवर जात असलेल्या एसटी बसेसना थांबा आहे. या स्थानकांत प्रवासी व स्थानिकांची वर्दळ असल्याने नित्याची गर्दी आढळते. या आगारात पावसाळ्यात मोठे मोठे पडलेले आहेत तसेच आहेत. त्यामुळे प्रवाशांना धक्का बसतो, तसेच खड्डे चुकविताना वाहनचालकांचीसुद्धा भंबेरी उडते. शिवाय आगारात बेशिस्तीने लहान-मोठी वाहने अनधिकृतपणे उभी करण्यात येत आहेत. त्याचा येणा-जाणार्या एसटी बसेसना अडथळा होत आहे. तरी, बसस्थानकातील दुरवस्था आणि अनधिकृतरित्या उभी करण्यात येत असलेली वाहने तात्काळ हलविण्याची कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांमधून करण्यात येत आहे.