खोदलेले रस्ते अपघातांना आमंत्रण

रस्त्यांची दुरुस्ती केव्हा करणार? उरणकरांचा सिडकोला सवाल

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोड वसाहतीत महानगर गॅसच्या पाईप लाईनसाठी रस्ते खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे खोदलेले रस्ते ठेकेदाराकडून माती टाकून अर्धवट स्थितीत बुजविण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यावरुन मार्गक्रमण करणार्‍या वाहनांना अपघाताला कारणीभूत ठरत असल्याने खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती केव्हा करणार, असा संतप्त सवाल प्रवासी नागरिक सिडको प्रशासनाला विचारत आहेत.

उरण शहर, द्रोणागिरी नोड भागातील रस्त्यांची खोदाई ही महानगर गॅसच्या पाईप लाईनसाठी करण्यात आली आहे. मात्र, संबंधित प्रशासनाच्या डोळेझाक कारभारामुळे महानगर गॅसच्या पाईप लाईनसाठी खोदण्यात आलेल्या रस़्त्यांची व्यवस्थित डागडुजी ही ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे योग्य प्रकारे होत नाही. त्यामुळे खोदण्यात आलेल्या रस्त्याचे काम हे दर्जेदार होत नाही. एकंदरीत, अशा खोदलेल्या रस्त्यातून प्रवासी वाहनांना मार्गक्रमण करावा लागत आहे.

सध्या द्रोणागिरी नोड वसाहतीतील सेक्टर 51-52 या परिसरातील नागरिकांच्या रहदारीचा रस्ता हा महानगर गॅस पाईप लाईनसाठी काही दिवसांपूर्वी संबंधित ठेकेदाराकडून खोदण्यात आलेला आहे. मात्र, त्या रस्त्यावर आजतागायत खडी-डांबर न टाकल्याने नागरिकांना, प्रवासी वाहन चालकांना त्रासदायक ठरत आहे. तरी अपघात-जीवितहाणी होण्याची वाट न पाहता सिडको, महानगर गॅसच्या अधिकारी वर्गाने तातडीने खोदलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version