महावितरणचे आवाहन! बिल भरण्यासाठी ऑनलाईनच वापरा

| कल्याण | वार्ताहर |

विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार 1 ऑगस्टपासून लघुदाब वीज ग्राहकांना त्यांचे पाच हजार रुपयांपर्यंतचेच वीजबिल रोखीने भरता येणार आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकांसोबतच इतरांनीही सुरक्षित, सुलभ आणि निशुल्क असलेल्या डिजिटल पर्यायांचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने वीजबिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

आयोगाच्या आदेशानुसार लघुदाब वर्गवारीतील (कृषिपंप ग्राहक वगळून) सर्व ग्राहकांना दरमहा कमाल पाच हजार रुपयांपर्यंतच वीजबिल रोख भरता येणार आहे. तर लघुदाब कृषिपंप ग्राहकांसाठी रोखीने वीजबिल भरण्याची कमाल मर्यादा दरमहासाठी दहा हजार रुपये आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच ग्राहकांसाठीच्या मोबाईल पद्वारे केंव्हाही आणि कुठुनही ऑनलाईन पद्धतीने कोणत्याही मर्यादेशिवाय वीजबिलाचा भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. क्रेडिट किंवा डेबिट कार्ड, नेटबँकींग आणि युपीआय आदी डिजिटल माध्यमातून ऑनलाईन वीजबिल भरता येते. भारत बिल पेमेंट (BBPS) तसेच फोन पे, गुगल पे यासारख्या पेमेंट द्वारे वीजबिलाचा ऑनलाईन भरणा सुलभ आहे. याशिवाय पाच हजार रुपयांपेक्षा अधिक वीजबिल असलेल्या ग्राहकांसाठी महावितरणने RTGS/NEFT द्वारे देयक भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासंबंधीचा तपशिल वीजबिलावर नमूद करण्यात आला आहे.

वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करणाऱ्या ग्राहकांना वीजबिल रकमेच्या पाव टक्का (कमाल 500 रुपये) सवलत देण्यात येते. वीजबिलाचा ऑनलाईन भरणा सुरक्षित, सुलभ व निशुल्क असून हा भरणा रिझर्व्ह बँकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा 2007 च्या अंतर्गत येतो. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांनी त्यांच्या वीजबिलाचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Exit mobile version