24 लाख 38 हजार ग्राहकांनी घरबसल्या भरले वीजबिल
| कल्याण | प्रतिनिधी |
महावितरणच्या कल्याण आणि भांडुप परिमंडलात 20 फेब्रुवारीपर्यंत 24 लाख 38 हजार लघुदाब ग्राहकांनी त्यांचे वीजबिल ऑनलाईन भरले आहे. तत्पूर्वीच्या जानेवारी महिन्यात 38 लाख 48 हजार ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर केला होता. त्यामुळे या ग्राहकांचे बिल भरणा केंद्रासमोर रांगेत उभे राहण्याचे कष्ट व वेळ वाचले, शिवाय बिलात पाव टक्का सवलतही मिळाली.
दरम्यान, जानेवारी ते मे 2025 या काळात सलग तीन वा अधिक वीजबिले ऑनलाईन भरणार्या ग्राहकांना लकी ड्रॉद्वारे स्मार्टफोन, स्मार्टवॉच अशी आकर्षक बक्षिसे जिंकण्याची नामी संधी आहे. सर्व ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. कल्याण परिमंडलात जानेवारी महिन्यात 20 लाख 988 लघुदाब ग्राहकांनी 456 कोटी 22 लाख रुपयांची वीजबिले ऑनलाईन भरली. तर 20 फेब्रुवारीपर्यंत 13 लाख 22 हजार 606 ग्राहकांनी 280 कोटी 30 लाख रुपयांचे त्यांचे वीजबिल ऑनलाईन भरले आहे. भांडुप परिमंडलात जानेवारी महिन्यात 18 लाख 47 हजार 151 लघुदाब ग्राहकांनी 553 कोटी 41 लाख रुपयांची वीजबिले ऑनलाईन भरली. तर 20 फेब्रुवारीपर्यंत 11 लाख 14 हजार 990 ग्राहकांनी त्यांच्या 329 कोटी 82 लाख रुपयांच्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा केला.
ऑनलाईन बिल भरा आणि व्हा ‘लकी’
महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल, मे व जून 2025 या प्रत्येक महिन्यात एक प्रमाणे तीन लकी ड्रॉ ऑनलाईन काढण्यात येणार आहेत. प्रत्येक लकी ड्रॉमध्ये पाच विजेत्यांना स्मार्टफोन व स्मार्टवॉच ही बक्षिसे दिली जाणार आहेत.