। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 3 वर उभ्या असलेल्या रत्नागिरी-दिवा पॅसेंजर गाडीत तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित तरुणी ही सकाळी 5.30 च्या रत्नागिरी-दिवा पॅसेंजर गाडीने खेड येथे महाविद्यालयात लेक्चरसाठी जात होती. सकाळी गाडीला जास्त प्रवासी नसल्याने ती बसलेल्या गाडीचा डबा रिकामाच होता. सकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी हा दबक्या पावलांनी तरुणीच्या पाठीमागील बाजूने आला. यावेळी बेसावध असलेल्या तरुणीची मान पकडून तिच्याशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न करीत विनयभंग केला. संशयित आरोपीच्या ताब्यातून सुटण्यासाठी तरुणीने प्रतिकार करण्यास सुरुवात केली. अखेर आपली पकड सुटत असल्याचे लक्षात येताच आरोपीने पीडित तरुणीला जोरात ढकलून दिले. तिने आपल्या नातेवाईकांना फोन करुन याची माहिती दिली. घडल्या प्रकाराबाबत तरुणीने रेल्वे पोलिसांसह रत्नागिरी शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यानुसार आरोपीचा माग काढत पोलिसांनी संशयित आरोपी निम्रान याला चिपळूणमधून ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक शीतल पाटील करत आहेत.