बाळासाहेब मिरजे यांचा आरोप
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईत घर खरेदी नोंदणीत मोठा घोटाळा झाला आहे. दरम्यान, या घर नोंदणी घोटाळ्यातील ठाणे जिल्ह्यातील एका मंत्र्याचे पाठबळ असल्याचा संशय मिरजे यांनी व्यक्त केला आहे. नवी मुंबईमधील सदनिकांची एकाच दिवशी 102 दस्त नोंदणी झाली असून, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आरपीआय नेते बाळासाहेब मिरजे यांनी केली आहे.
या घटनेला दुय्यम निबंधक 10 या कार्यालयातील अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. या घोटाळ्यातील दुय्यम निबंध 10 या कार्यालयातील भ्रष्ट अधिकार्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच झालेल्या भ्रष्ट कारभारातील शेकडो नोंदणी रद्द करण्यात याव्यात. याप्रकरणी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
नवी मुंबई येथील सानपाडा येथे 20 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ठाणे विभाग 10 दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीच्या भ्रष्टाचाराची फाईलच बाळासाहेब मिरज यांनी पत्रकारांसमोर उघड केली. यावेळी त्यांच्यासोबत दत्तात्रय निंबाळकर, संगीता टाकळकर, चंदू पाटील आदी उपस्थित होते.
मिरजे पुढे म्हणाले की, अनधिकृत बांधकाममधील सदनिकांचे दस्त नोंदणी करू नका, असा आदेश सह जिल्हा निबंधक वर्ग एक यांनी 4 नोव्हेंबर 2024 रोजी काढला होता, तरीसुद्धा सहा डिसेंबर 2024 रोजी 102 दस्त नोंदणी एकाच दिवशी बेकायदेशीररित्या झाली. याप्रकरणी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने 11 डिसेंबर 2014 रोजी सहनिबंधक वर्ग एक ठाणे जिल्हा यांच्याकडे रितसर तक्रार करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाच्या तक्रारीनंतर वर्ग एक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन एका समितीची स्थापना करून एक अहवाल तयार करण्यात आला. या अहवालामध्ये एका दिवसात झालेल्या 102 दस्त नोंदणी बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले. नवी मुंबईमधील अनधिकृत बांधकाम अतिक्रमण वाढण्यास व सर्वसामान्यांची फसवणुकीस या विभागातील सिद्दिकी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. वरिष्ठ लिपिक सिद्दिकी यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून सिडको महामंडळाचे सूचना व वरिष्ठ अधिकार्यांच्या सूचनांचे पालन करीत नाहीत व नियमांना डावलून स्वार्थ आणि मनमानी कारभार करीत असल्याचा गंभीर आरोपही या पत्रकार परिषदेत करण्यात आला.