आयपीएलचा लिलाव पहिल्यांदाच देशाबाहेर

दुबईत 19 डिसेंबरला पार पडणार प्रक्रिया

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

इंडियन प्रीमियर लीगच्या 17व्या हंगामाचा (आयपीएल 2024) लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. आयपीएलचा लिलाव भारताबाहेर होण्याची ही पहिलीच वेळ असेल. सर्व 10 फ्रँचायझींना पाठवलेल्या संदेशात बीसीसीआयने असेही सांगितले की, कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याची अंतिम तारीख 26 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे.

आगामी हंगाम हे खेळाडूंसाठी तीन वर्षांच्या कराराचे तिसरे आणि अंतिम वर्ष असेल. पुढील वर्षी मेगा लिलाव होणार आहे. बीसीसीआयने गेल्या वर्षीचा लिलाव इस्तंबूलमध्ये आयोजित करण्याचा विचार केला होता, परंतु हा विचार मागे घेतला होता. आयपीएलने शुक्रवारी जाहीर केले की, 2023 च्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स सोबत असलेल्या वेस्ट इंडिजचा खेळाडू रोमॅरियो शेफर्डचा पुढील हंगामासाठी मुंबई इंडियन्सोबत व्यवहार (ट्रेड) करण्यात आला आहे.

आयपीएल संघांना कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यासाठी 26 नोव्हेंबरपर्यंत वेळ असेल. सर्व 10 आयपीएल संघांच्या पर्समध्ये 100 कोटी रुपये असतील, जे गेल्या हंगामापेक्षा 5 कोटी रुपये जास्त आहेत. सध्या, पंजाब किंग्जकडे सर्वात जास्त शिल्लक रक्कम 12.20 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर पाच वेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सकडे सर्वात कमी शिल्लक रक्कम 0.05 कोटी रुपये आहेत. याशिवाय सनरायझर्स हैदराबादकडे 6.55 कोटी रुपये आहेत. गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोघांकडे 4.45 कोटी आहेत. त्याच वेळी, लखनऊ सुपर जायंट्सकडे 3.55 कोटी रुपये आहेत. राजस्थान रॉयल्सकडे 3.35 कोटी आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडे 1.75 कोटी रुपये आहेत. तसेच कोलकाता नाइट रायडर्सकडे 1.65 कोटी आणि गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जकडे 1.5 कोटी रुपये शिल्लक आहेत.

Exit mobile version