‘नरेंद्र मोदी स्टेडियम’वर रंगणार ‘आयपीएल’चे प्लेऑफचे सामने


। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

आयपीएलच्या यंदाच्या स्पर्धेवरही कोरोनाचे सावट आहे. पण यंदाची स्पर्धा भारतातच व्हावी, यासाठी बीसीसीआयने चांगलीच कंबर कसली आहे. 2020 मध्ये आयपीएलची संपूर्ण स्पर्धा युएईच्या मैदानात पार पडली. गत हंगामाची सुरुवात भारतात झाली पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर स्पर्धा युएईला स्थलांतरित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पण यंदाची संपूर्ण स्पर्धा भारतात खेळवण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी यांसदर्भात संकेत दिले आहेत.
आयपीएलच्या 15 व्या हंगामातील सर्व सामने महाराष्ट्रातील दोन शहरात खेळवण्यात येणार असल्याची चर्चा रंगली असताना आता यात गुजरातची भर पडल्याचे समोर येत आहे. महाराष्ट्रातील मुंबई-पुण्यासह जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या अहमदाबादच्य नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचे महत्त्वपूर्ण सामने खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. यासाठीच्या चर्चा देखील सुरु झाल्याचे समजते. आगामी आयपीएल स्पर्धेतील साखळी फेरीतील लढती या महाराष्ट्रात खेळवण्याचा विचार असून प्ले ऑफच्या लढती या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्याचा विचार सुरु आहे. अद्याप बीसीसीआयने यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
गुरुवारी बीसीसीआयच्या पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. यावेळी संपूर्ण स्पर्धा ही भारतातच आयपीएल आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या तीन ठिकाणी आयपीएलचे साखळी फेरीतील सर्व सामने खेळवण्याची बीसीसीआयची योजना आहे. मुंबईतील वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियम, नवी मंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियम आणि पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर आयपीएल सामने खेळवले जाऊ शकतात. प्लेऑफचे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्याचा प्लॅन बीसीसीआयने आखला आहे.

Exit mobile version