| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
बीसीसीआयने नुकतेच इंडियन प्रीमियर लीगचे प्रारंभिक वेळापत्रक जाहीर केले. पाच राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, बीसीसीआयने 12 एप्रिलपर्यंतच वेळापत्रक जाहीर केले होते, ज्यामध्ये एकूण 20 सामने जाहीर झाले होते. अशातच, रविवारी निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यावर, आयपीएल वेळापत्रकाने पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. बीसीसीआयला वेळापत्रकात आणखी बदल करावे लागू शकतात अशी चर्चा आहे.
निवडणूक आयोगाने आसामसाठी 9 एप्रिल रोजी मतदानाची तारीख निश्चित केली आहे. याचा अर्थ असा की आसामच्या 126 विधानसभा जागांसाठी गुरुवारी, 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल. मात्र आयपीएल वेळापत्रकाकडे पाहिल्यास, 7 एप्रिल रोजी गुवाहाटीमध्ये एक सामना नियोजित करण्यात आला आहे. यावेळी आसाममधील गुवाहाटीमधील बरसापारा क्रिकेट स्टेडियमचा समावेश 10 आयपीएल यजमान मैदानांमध्ये करण्यात आला आहे. हे मैदान राजस्थानचे दुसरे होम ग्राउंड देखील आहे. राजस्थान रॉयल्सचे तीन सामने गुवाहाटीमध्ये नियोजित करण्यात आले आहेत.
गुवाहाटीत पहिला सामना 30 मार्च रोजी होणार आहे, ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होईल. दुसरा सामना 7 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळला जाईल. तिसरा सामना 10 एप्रिल रोजी आरसीबी विरुद्ध होईल. तिन्ही सामने संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होतील.
आता 9 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकांमुळे आयपीएलचे वेळापत्रक बदललं जाईल का? सध्या याबद्दल काहीही स्पष्ट नाही. वेळापत्रक जाहीर करण्यापूर्वी बीसीसीआयने सरकार आणि प्रशासनाशी सल्लामसलत केली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवश्यक त्या परवानग्या आधीच मिळाल्या असतील असे मानले जाते. खरं तर, आसाममध्ये 9 एप्रिल रोजी मतदान आहे. परिणामी, 7 तारखेपासून निवडणूक प्रचार थांबेल आणि निर्बंध वाढतील. मतदान केंद्रांवर पोलिसही तैनात केले जातील. गुवाहाटीत सामना 7 एप्रिल रोजी संध्याकाळी आहे. दरम्यान, 9 एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर 10 एप्रिल रोजी पोलीस विभागासमोर अनेक आव्हानं असतील. मात्र निवडणुकीदरम्यान सुरक्षा हे एक मोठं आव्हान असू शकते. निवडणुकीची तयारी साधारणपणे मतदानाच्या 1-2 आठवडे आधी सुरु होते. या काळात, पोलीस आणि सुरक्षा दलांना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.
वेळापत्रक लवकरच बीसीसीआय
आयपीएल 2026 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करु शकते. त्यानंतर गुवाहाटीमध्ये होणाऱ्या सामन्यांच्या तारखा पुन्हा शेड्यूल केल्या जातील की नाही हे स्पष्ट होईल.






