। बंगळुरू । वृत्तसंस्था ।
कर्नाटकमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. पदभार स्वीकारण्यास जाणाऱ्या परिविक्षाधीन आयपीएस हर्षवर्धन यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात आयपीएस हर्षवर्धन यांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
हा अपघात रविवारी (दि. 01) संध्याकाळच्या सुमारास झाला. प्रशिक्षण पूर्ण करुन हर्षवर्धन (26) कर्नाटकमधील होलेनरसीपूर येथे परिवीक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होण्यासाठी जात होते. त्याचवेळी हासनपासून 10 किलोमीटर लांब असणाऱ्या किट्टाने या गावाजवळ आले असता गाडीचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घराला आणि झाडाला धडकली. या भीषण अपघातात हर्षवर्धन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर, त्यांच्या गाडीचा चालक मंजेगौडा याला किरकोळ दुखापत झाली आहे.